रत्नागिरीतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष अद्ययावत करणार : पालकमंत्री उदय सामंत
By मनोज मुळ्ये | Published: July 22, 2023 06:28 PM2023-07-22T18:28:49+5:302023-07-22T18:51:57+5:30
१ कोटी रुपयांची तरतूद करणार
रत्नागिरी : अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळणे, वादळ अशा सर्वच प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष अत्याधुनिक असणे आवश्यक आहे. आपण रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती कक्षाचे डिजिटलायझेशन करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री सामंत यांनी सकाळच्या सत्रातच या कक्षाला भेट देऊन पाहणी केली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाला अधिक महत्त्व आले आहे. कोठेही आपत्ती ओढवते तेव्हा या कक्षाकडूनच सर्व गोष्टींचे नियंत्रण केले जाते. त्यासाठी येथील संपर्क यंत्रणा सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे त्याचे डिजिटलायझेशन गरजेचे आहे. या कक्षाकडून प्रत्येक तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांच्याशी थेट संपर्क साधला जावा, यासाठी हॉटलाईनची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अन्य संपर्क यंत्रणाही आधुनिक करण्याची गरज आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.
या कामासाठी सुमारे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने अधिकाऱ्यांनी त्याबाबत पुढाकार घेतला नव्हता. इतक्या मोठ्या निधीची तरतूद कशी होणार, असा त्यांच्यासमोरील प्रश्न होता. मात्र आता निधी उपलब्ध करण्याची जबाबदारी आपण घेतली आहे. त्यामुळे लवकरच हे काम हाती घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.