चिपळुणातील आपत्ती व्यवस्थापन ठरले कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:33 AM2021-07-28T04:33:22+5:302021-07-28T04:33:22+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : दरवर्षी पावसाळ्यात येथे भीषण पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : दरवर्षी पावसाळ्यात येथे भीषण पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन केले जाते. मात्र, यावेळी नगर परिषदेची यंत्रणा कुचकामी ठरल्याने त्याचा मोठा फटका शहरातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना बसला आहे. याला नगर परिषद प्रशासनापेक्षा पदाधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
ते पुढे म्हणाले की, यावेळच्या महापुराने चिपळूणच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठी उंची गाठली. त्यामुळे बाजारपेठेसह आजूबाजूचा परिसर बाधित झाला आणि व्यापाराबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा मोठा फटका बसला. या महापुरात माझ्याही घरी पुराचे पाणी शिरल्याने मला टेरव गावी स्थलांतरित व्हावे लागले. मात्र, महापूर ओसरल्यानंतर आपण प्रत्येक अधिकाऱ्याच्या संपर्कात असून, त्यांना वेळोवेळी मदत व मार्गदर्शन करीत आहे. प्रत्यक्षात नगर परिषदेने आपत्ती व्यवस्थापनाचे कोणतेही नियोजन केले नव्हते.
दरवर्षी पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोवळकोट, पेठमाप व बाजारपेठ भागात बोटी सज्ज ठेवल्या जात होत्या. तसेच नावाडी २४ तास सज्ज राहत होते. याशिवाय शहरात पोहणाऱ्या नागरिकांची यादी व त्यांचे संपर्क ठेवले जात होते. तसेच जेसीबी, डंपर वाहने यंत्रणा तत्काळ उपलब्ध केली जात होती. परंतु, यावेळी असे कोणतेही नियोजन झाले नाही. मुळात यापुढे पूरपरिस्थितीचा अंदाज घेता शहरातील बांधकामांविषयी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी नगर परिषद प्रशासनाने विशेष लक्ष घालण्याची गरज आहे, असे कदम यांनी सांगितले.