अर्जुना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणावरून पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:28 AM2021-07-26T04:28:29+5:302021-07-26T04:28:29+5:30

- धरणातून पाणी सोडल्याने पूर येतो अशा अफवांवर विश्वास ठेवू नये लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : तालुक्यातील अर्जुना मध्यम ...

Discharge of water from Arjuna Dam at full capacity | अर्जुना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणावरून पाण्याचा विसर्ग

अर्जुना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणावरून पाण्याचा विसर्ग

Next

- धरणातून पाणी सोडल्याने पूर येतो अशा अफवांवर विश्वास ठेवू नये

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्पातून पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दरवाजा नाही. पावसाळ्यात आणि पूरपरिस्थिती काळात अर्जुना धरणातील पाणी सोडल्याने पुराचे पाणी वाढले व पूरपरिस्थिती निर्माण झाली, अशा कोणत्याही प्रकारच्या अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांनी केले आहे.

या पावसाळ्यात धरण पूर्णपणे भरलेले आहे, त्यातच गेले तीन ते चार दिवस धरण परिसरात प्रतिदिन २०० ते ३०० मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणाच्या वरून होणारा पाण्याचा विसर्ग वाढला असून, अर्जुनेच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झालेली आहे, तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे अर्जुनेला मोठा पूर आलेला आहे, असेही सलगर यांनी सांगितले.

अर्जुना धरणाचे नियंत्रण असणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अशा प्रकारे पाणी सोडण्याची कोणतीही यंत्रणाच धरणात नाही, कारण या धरणाला पाणी सोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दरवाजा नाही. त्यामुळे पावसाळ्यात काय पण उन्हाळ्यातही पाणी सोडू शकत नाही. मात्र, या धरणाला डावा आणि उजवा असे दोन कालवे असून, या कालव्यांतून पाणी सोडण्यासाठी एक छोटा दरवाजा आहे. मात्र, पावसाळ्यात हा पूर्णपणे बंद केलेला असतो, कारण पावसाळ्यात कालव्यांमध्ये पाणी सोडले जात नसल्याचे सलगर यांनी सांगितले. उन्हाळ्यात कालव्यांमध्ये पाणी सोडले जाते व त्यावेळी त्या - त्या भागात माहिती दिली जाते.

या धरणाची लांबी १२६० मीटर, तर उंची ही ७० मीटर इतकी असून, सध्या धरण पूर्णपणे भरलेले आहे. धरणाची पाणीसाठ्याची क्षमता ही २.६३ टीएमसी इतकी आहे. त्यामुळे धरण आता पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या वरून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत आहे. त्यातच गेल्या तीन ते चार दिवसात धरण परिसरात आणि धरणाच्या वरच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर म्हणजे अगदी प्रतिदिन २०० ते ३०० मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे या परिसरात माेठ्या प्रमाणावर पाणी वाढले व धरणातूनही माेठ्या प्रमाणावर पाणी ओव्हर फ्लोने वाहू लागले. त्यामुळे अर्जुना नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झालेली आहे. मात्र, रात्री - अपरात्री धरणातून पाणी सोडले जाते, अशा कोणत्याही अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन सलगर यांनी केले आहे. राजापूर तालुक्यातील चिंचवाडी धरणही पूर्णपणे भरले असून, धरणाच्या वरून पाण्याचा विसर्ग होत असल्याचे सलगर यांनी सांगितले.

Web Title: Discharge of water from Arjuna Dam at full capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.