जैतापूर परिसरात नव्या जागतिकस्तरीय फुलवनस्पतीचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:23 AM2021-06-05T04:23:44+5:302021-06-05T04:23:44+5:30
विनाेद पवार / राजापूर : तालुक्यातील जैतापूर परिसरातील साखर, कोंबे, करेल परिसरातील कातळावरील डबक्यात फुलणाऱ्या जांभळी मंजिरीवर्गीय पोगोस्टेमॉन ‘जैतापूरेंनसींस ...
विनाेद पवार / राजापूर : तालुक्यातील जैतापूर परिसरातील साखर, कोंबे, करेल परिसरातील कातळावरील डबक्यात फुलणाऱ्या जांभळी मंजिरीवर्गीय पोगोस्टेमॉन ‘जैतापूरेंनसींस चांदोरे व एस. आर. यादव’ या नव्या जागतिकस्तरीय फुलवनस्पतीचा शोध लागला आहे. जैतापूर गावाच्या नावावरून या नव्या वनस्पतीला नाव देण्यात आले आहे. ‘पोगोस्टेमॉन’ हा तुळशीवर्गीय कुळातील गण असून, याच्या जगामध्ये ८६ प्रजाती आहेत. त्यापैकी ४१ प्रजाती भारतामध्ये आढळतात. त्यातील १९ प्रजाती या प्रदेशानिष्ठ आहेत.
सुमारे पाच वर्षांच्या संशोधनानंतर या फुलवनस्पतीचा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव, राजापूरच्या आबासाहेब मराठे महाविद्यालयातील प्रा. डॉ. अरूण चांदोरे, त्यांचे संशोधक विद्यार्थी देवीदास बोरूडे, दक्षिण कोरियाच्या जीवरसायनशास्त्र विभागाचे डॉ. असिफ तांबोळी, प्रा. डॉ. संजय गोविंदराव, नाशिक येथील व्ही. एन. नाईक महाविद्यालयाचे अविनाश घोलवे आदींनी या फुलवनस्पतीचा शोध लावला आहे. या संशोधनात आबासाहेब मराठे विद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार, प्रा. एस. जी. मेंगाळ, डॉ. विनोदकुमार गोसावी, शरद कांबळे, नंदकुमार साळुंके आदींसह भारत सरकारच्या नवी दिल्ली येथील विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन मंडळाचे सहकार्य लाभले.
कोकणातील कातळावरील वनस्पतींचा अभ्यास करताना, २०१५मध्ये ही फुलवनस्पती प्रथम संशोधकांच्या निदर्शनाला आली. त्यानंतर तिचा अभ्यास केला असता, जांभळी मंजिरीच्या म्हणजेच ‘पोगोस्टेमॉन डेक्कनेसींस’च्या जवळची असल्याचे लक्षात आले. त्यानंतर केलेला अभ्यास आणि संशोधनानंतर या फुलवनस्पतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या नव्या फुलवनस्पतीचे संशोधन न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या ‘फायटोटॅक्सा’ या जागतिकस्तरीय नियतकालिकामधून गत आठवड्यात प्रकाशित झाले आहे.
---------------------
प्रदेशानिष्ठ वनस्पती
नव्या संशोधित वनस्पतीची फुले गुलाबी रंगाची आणि बारीक आहेत. त्यांची लांबी ५ मिलिमीटर तर, पुंकेसर ४ व गुलाबी रंगाचे आणि ४ ते ५ मिलिमीटर लांब असतात. या वनस्पतीची फुले आणि फळांचा कालावधी नोव्हेंबर ते फेबुवारी असा असून, जैतापूरच्या सुमारे ५ किलाेमीटर परिसरामध्ये प्रदेशानिष्ठ वनस्पती म्हणून आढळत आहे.