रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत कोणाला किती मते मिळाली?.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 05:50 PM2024-10-16T17:50:30+5:302024-10-16T17:51:03+5:30
भाजप आणि काँग्रेसची पाटी कोरीच राहणार?
रत्नागिरी : पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीप्रसंगी राजकीय समीकरणे वेगळी होती. मित्रपक्ष वेगवेगळे होते. त्यात पाचपैकी चार जागा शिवसेनेने जिकल्या होत्या आणि एक जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता गतवेळीच्या समीकरणांची चर्चा प्राधान्याने सुरू झाली आहे.
वर्ष २०१९ मध्ये शिवसेना पहिल्या क्रमांकाचा, तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता; पण आता या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे आपलीच ताकद अधिक आहे, हे दाखवण्यासाठी या दोन्ही पक्षांतील सर्व गटांना लढत द्यावी लागणार आहे. उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) अशाच लढती जिल्ह्यात होणार आहे.
पक्ष, चिन्हात बदल
गत निवडणुकीच्या तुलनेत आमदार राजन साळवी आणि आमदार भास्कर जाधव यांच्या पक्षाच्या नावात आणि चिन्हात बदल झाला आहे. ते आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या नावाने व धनुष्यबाणाऐवजी मशाल चिन्हावर निवडणूक लढवतील.
भाजप आणि काँग्रेसची पाटी कोरीच राहणार?
गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीत चार जागा राष्ट्रवादीने, तर एक जागा काँग्रेसने लढवली होती. यावेळी काँग्रेसला कुठला मतदारसंघ सुटण्याची शक्यता आता तरी दिसत नाही. तीच स्थिती भाजपची आहे. गतवेळी भाजपला पाचपैकी एकही जागा मिळाली नव्हती. याहीवेळी शक्यता नाही. त्यामुळे या दोन पक्षांची पाटी कोरीच राहणार आहे.
काय होते विधानसभानिहाय चित्र (टॉप उमेदवार)?
विधानसभा - उमेदवार (कंसात मते) - तेव्हाचा पक्ष कोणता?
रत्नागिरी - उदय सामंत (१,१८,४८४) - शिवसेना
रत्नागिरी - सुदेश मयेकर (३१,१४९) - राष्ट्रवादी
राजापूर - राजन साळवी (६५,४३३) - शिवसेना
राजापूर - अविनाश लाड (५३,५५७) - काँग्रेस
चिपळूण - शेखर निकम (१,०१,५७८) - राष्ट्रवादी
चिपळूण - सदानंद चव्हाण (७१,६५४) - शिवसेना
गुहागर - भास्कर जाधव (७८,७४४) - शिवसेना
गुहागर - सहदेव बेटकर (५२,२९७) - राष्ट्रवादी
दापोली - योगेश कदम (९५,३६४) - शिवसेना
दापोली - संजय कदम (८१,७८६) - राष्ट्रवादी
सध्याच्या गणितानुसार पक्षनिहाय संख्याबळ
भाजप : ००
शिंदे सेना : ०२
अजित पवार गट : ०१
कॉंग्रेस : ००
राष्ट्रवादी : ००
उद्धव सेना : ०२