जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभेत विविध विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:33 AM2021-09-25T04:33:52+5:302021-09-25T04:33:52+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पार पडली. या सभेत प्रत्येक तालुका क्षेत्रीय कार्यालयात ...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पार पडली. या सभेत प्रत्येक तालुका क्षेत्रीय कार्यालयात कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामाजिक अंतर राखून सहभाग घेतला हाेता. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. काेराेना काळातही कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याने अध्यक्ष डाॅ. चाेरगे यांनी समाधान व्यक्त केले.
सभेमध्ये बॅंकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी बँकेच्या खेड येथील क्षेत्रीय कार्यालयामधून तसेच संचालक मंडळ सदस्यांनी त्या-त्या तालुक्यातील क्षेत्रीय कार्यालयामधून ऑनलाईन सहभाग घेतला हाेता. बँकेचे सभासद प्रतिनिधी बँकेच्या प्रधान कार्यालय, रत्नागिरी येथील सभागृहात तसेच तालुका क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून सहभागी झाले हाेते.
सभेला बँकेच्या प्रधान कार्यालयामध्ये बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, कार्यकारी संचालक सुनील गुरव, बँकेचे सरव्यवस्थापक अजय चव्हाण, डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांचेसह बँकेचे अधिकारी उपस्थित होते. बँकेचे कार्यकारी संचालक सुनील गुरव यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी त्यांचे विवेचन करून सभासद प्रतिनिधींशी सुसंवाद साधला. बँक सभासद प्रतिनिधी सुधाकर सावंत यांनी बँकेच्या चांगल्या कामगिरीबद्दल व सामाजिक बांधिलकी म्हणून कोविड- १९ चे संक्रमण कालावधीत आर्थिक निधीची मदत केली असल्याने अभिनंदनाचा ठराव मांडून शुभेच्छा दिल्या.