जिल्हा परिषद प्रश्नांवर आज मुंबईत चर्चा

By admin | Published: March 19, 2015 10:10 PM2015-03-19T22:10:31+5:302015-03-19T23:52:00+5:30

पालकमंत्र्यांची उपस्थिती : रिक्त पदे, विंधन विहिरीबाबत निर्णय अपेक्षित

Discussion on Zilla Parishad issues in Mumbai today | जिल्हा परिषद प्रश्नांवर आज मुंबईत चर्चा

जिल्हा परिषद प्रश्नांवर आज मुंबईत चर्चा

Next

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या अनेक प्रलंबित विषयांपैकी काही अति महत्त्वाचे विषय शासनाकडे मांडून ते सोडवण्यासाठी दि. २० मार्च रोजी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याशी मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी दिली.
या बैठकीला अध्यक्ष जगदीश राजापकर, उपाध्यक्ष सतीश शेवडे, सर्व सभापती व काही सदस्य आणि सर्व विभागप्रमुख मुंबईला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये महत्त्वाच्या प्रलंबित विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामध्ये सन २००९-१०, २०११-१२ सालात तेराव्या वित्त आयोगातून अंगणवाडीसाठी ६ कोटी ४५ लाख रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. ही रक्कम पडून असून ती खर्च करण्याची मागणी यावेळी पालकमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेची वर्ग-१, वर्ग-२ ची पदे दीड ते दोन वर्षे रिक्त आहेत. विंधन विहिरी खोदाईचे नवीन दर मान्यता मिळविण्यासाठी, लघुपाटबंधाऱ्यांच्या प्रस्तावित ५३ बंधाऱ्यांसाठी ५ कोटी ७५ लाख रुपयांची अवश्यकता आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांची २१ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद निवड समितीचे अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षांकडे आणि सर्व सभापती समिती सदस्यपदी असावेत, बदल्यांचे अधिकार अध्यक्ष, सभापतींना देण्यात यावेत, अशा विविध मागण्या या बैठकीत मांडण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी काळम यांनी सांगितले.
जिल्हापरिषदेच्या अनेक विषयांवरील प्रश्नांची पूर्तता होण्याबाबत या बैठकीत काही सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याशी होणाऱ्या चर्चेतून जिल्ह्यासाठी काही उपलब्धी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या प्रलंबित विषयांवर होणाऱ्या चर्चेतून जिल्ह्यासाठी काही हाती लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: Discussion on Zilla Parishad issues in Mumbai today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.