भातावरील रोग? वेळीच घ्या काळजी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:37 AM2021-09-09T04:37:56+5:302021-09-09T04:37:56+5:30
रत्नागिरी : हवामानात होणाऱ्या सातत्यपूर्ण बदलामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच जागृत ...
रत्नागिरी : हवामानात होणाऱ्या सातत्यपूर्ण बदलामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच जागृत राहून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रणात्मक उपाययोजना अवलंबणे गरजेचे आहे. भात पिकावर करपा, कडा करपा, शेंडे करपा या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाप्रमाणेच आभासमय काजळी या बुजरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. युस्टीलेजीनाॅयडीया व्हायरेन्स या बुरशीमुळे हा रोग होतो.
पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना या रोगाची लक्षणे भाताच्या लोंबीवर आढळतात. या रोगामुळे लोंबीतील दाण्यांचे रूपांतर हिरव्या रंगाच्या मखमली गाठींमध्ये होते. कालांतराने या गाठी फुटून त्यांचा आतील पिवळसर भाग दिसू लागतो. रोगकारक बुरशीची बिजे शेतात काही काळ जिवंत राहू शकतात. या बिजांमार्फत रोगाची प्राथमिक लागण होते. रोगाचा दुय्यम प्रसार पीक लोंबी भरण्याच्या अवस्थेत असताना वाऱ्यामार्फत पसरणाऱ्या बुरशी बिजांमुळे होतो. पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना ढगाळ वातावरण असल्यास रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. संकरित भात वाणावर रोगाचे प्रमाण अधिक असते.
हा रोग जास्त पाऊस होणाऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणात आढळतो. या रोगास पोषक वातावरण हे भात पिकाच्या वाढीसह चांगले असते. त्यामुळे सर्वसाधारण हा रोग आढळणाऱ्या वर्षी भाताचे उत्पादनही भरघोस मिळते, अशी समजूत आहे. या रोगामुळे लोंबीमध्ये दाणे भरण्यावर अनिष्ट परिणाम होऊन पळींजाचे प्रमाण वाढते.
रोगग्रस्त क्षेत्रातील बियाणे पेरणीसाठी वापरू नये. रोगास प्रतिकारक कमी बळी पडणाऱ्या जातींचा वापर करावा. कडकरपा व करपा रोगांच्या नियंत्रणासाठी करावयाची स्वच्छता व बीज प्रक्रिया या रोगासाठी उपयुक्त ठरते. शेतातील रोगट लोंब्या दिसताक्षणी काढून नष्ट कराव्यात, म्हणजेच रोग प्रसारास आळा बसेल. पिकाच्या वाढीच्या शेवटच्या अवस्थेत रोगाचा प्रादूर्भाव होत असल्याने बुरशीनाशकाच्या दोन फवारण्या करणे आवश्यक आहे.
पिंगट ठिपका
भातावरील अन्यश बुरशीजन्य रोगांपैकीच पिंगट ठिपका हा रोग आहे. याला ब्राऊन स्पाॅट असे संबोधले जाते. पर्णकोष आवरण रोगाने ग्रासीत झाल्यामुळे दाणे भरत नाहीत व अपरिपक्व दाण्यांच्या लोंबीतील प्रमाण वाढते. पिंगट ठिपक्याप्रमाणे पर्णकोष करपा या रोगामध्ये लाेंबी गुंडाळणाऱ्या सर्वात वरच्या पानाच्या आवरणावर मोठे व करड्या तपकिरी रंगाचे ठिपके आढळतात. त्यामुळे लोंबी पानातच अडकून राहते व अंशत: बाहेर पडते, लोंबी सडते.
कशी ओळखाल लक्षणे
पानावर लांबट गोल तपकिरी ठिपके आढळतात.
करपा व पिंगट ठिपका रोगांची लक्षणे ओळखण्याइतपत भिन्न असतात.
करपा रोगांचे ठिपके डोळ्यांच्या आकाराप्रमाणे असतात.
डोळ्याच्या कडा तपकिरी तर मध्यभाग राखाडी रंगाचा असतो.
पिंगट ठिपक्या रोगांचे ठिपके पूर्णत: तपकिरी असून, आकार लांब गोल असतो.
बुरशीजन्य फवारणी
पिंगट ठिपका रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोगाची लक्षणे दिसताच पिकावरती ५० टक्के ताम्रयुक्त बुरशीनाशकांची फवारणी करावी. ब्लायटाॅक्स ५० टक्के २ किलो किंवा २ किलो झायनेब ५०० लिटर पाण्यातून फवारल्यास रोग आटोक्यात येतो. पर्णकोष करपा रोग नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २.५ ग्रॅम, किंवा ब्लायटाॅक्स ५० टक्के २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डेझीम ५० डब्लू पी.१ ग्रॅम प्रति लिटर पाणी या बुरशीनाशकाची फवारणी फायदेशीर ठरते.
तपकिरी ठिपके
ड्रेचसलेरा सोरोकिनियाना नावाच्या बुरशीमुळे पानावर, अकुंरावर रोगाची लागण होते. पानावर अंडाकृती आकाराचे आणि तपकिरी करड्या रंगाचे ठिपके आढळून येतात. रोगाच्या ठिपक्याभोवती पिवळसर रंगाचे वलय दिसू लागते. लोंबीतील दाण्यांच्या टरफलावरसुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास संपूर्ण भात पीक गडद तपकिरी रंगाचे दिसते. रोगाचा प्रसार बियाण्यांमार्फतसुद्धा होऊ शकतो. सर्वसाधारण परिस्थितीत या रोगापासून मोठे नुकसान होऊ शकते. हा रोग खरीप हंगामात प्रत्येक वर्षी कमी अधिक प्रमाणात होतो.