निर्जंतुकीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:22 AM2021-06-18T04:22:20+5:302021-06-18T04:22:20+5:30
साखरपा : येथील ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय, निमशासकीय इमारतींमध्ये निर्जंतुकीकरणाची मोहीम राबविली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, अधिकारी ...
साखरपा : येथील ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय, निमशासकीय इमारतींमध्ये निर्जंतुकीकरणाची मोहीम राबविली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण मोहीम सरपंच विनायक गोवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली आहे.
धरणे भरली
लांजा : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने संततधार धरली आहे. त्यामुळे तालुक्यातील धरणे भरली आहेत. गेल्या आठवडाभर पावसाने जोरदार पडण्यास सुरुवात केल्याने ग्रामीण भागातील विहिरीही आता भरल्या आहेत. पावसामुळे तालुक्यातील पाणीटंचाई संपुष्टात आली आहे.
मेडिकल किटचे वाटप
देवरुख : अधोरेखित ट्रस्टतर्फे सार्वजनिक परिसरात वास्तव्याला असलेल्या बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह मेडिकल किटचे वाटप करण्यात आले. साडवली ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील चिरेखाणींवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना या किटचे वाटप करण्यात आले.
विविध ठिकाणी नुकसान
दापोली : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील मातीच्या घरांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून, काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत तसेच विद्युत उपकरणांचेही नुकसान झाले आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
रत्नागिरी : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. १ जूनपासून MHRD (www.mhrd.gov.in) या संकेत स्थळावरील http://nationalawardstoteachers.education.gov.in/newuser.aspx या लिंकवर नावनोंदणी सुरु झाली आहे.
मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण
रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी यांच्यामार्फत १ जुलैपासून मच्छीमार तरुणांना नौकानयनाची तत्वे, मासेमारी अवजारांचा वापर, मरिन डिझेल इंजिनची देखभाल व निगा याबाबतचे प्रशिक्षण मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात होणार आहे. यासाठी ३० जूनपर्यंत या कार्यालयाकडे अर्ज पाठवावे.
शेतीच्या कामाला वेग
मंडणगड : तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने सुरुवात चांगली केली आहे. दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून, शेतीच्या कामांमध्ये व्यग्र झाला आहे. बहुतांश भातपेरणी पूर्णत्वाला गेली आहे. त्यामुळे आता लावणीही यावेळी लवकर करता येणार आहे.
बिनव्याजी कर्ज योजना
रत्नागिरी : पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज योजना सरकारने जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सुमारे साडेसात हजार शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेत व्याजदर सवलत ३ टक्के आणि केंद्र शासनाकडून ३ टक्के अशा दोन्ही सवलतींचा फायदा मिळणार आहे.
चर धोकादायक
रत्नागिरी : शहरातील विविध भागातील रस्ते पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदण्यात आले आहेत. काही भागातील रस्त्यावरील चर बुजविण्यात आले आहेत. मात्र, काही भागात चर खोल पडलेले आहेत. त्यात पाणी साचल्याने रात्रीच्यावेळी लक्षात येत नाहीत. त्यामुळे या चरावरुन जाताना दुचाकीस्वारांचे कंबरडे मोडत आहे.
कादंबरीला पुरस्कार
गुहागर : शहरातील प्राथमिक शाळेचे शिक्षक असलेले ईश्वर हलगरे यांच्या ‘आरसा’ कादंबरीला लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण लातूर येथे होणार आहे. मराठवाडा आणि मुंबई येथील आर्थिक विषमता तसेच डान्सबार या अनुषंगाने अधोविश्व हे कादंबरीचे मध्यवर्ती सूत्र आहे.