जलशुध्दिकरण केंद्राशेजारीच कचऱ्याचे आगार
By admin | Published: February 22, 2015 10:48 PM2015-02-22T22:48:59+5:302015-02-23T00:20:51+5:30
पालिकेचा आंधळा कारभार : तप उलटले तरी निर्धारापलिकडे उडीच नाही
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात दरदिवशी संकलित होणाऱ्या २२ टन कचऱ्यामुळे शहराची कचरा समस्या गंभीर झाली आहे. गेल्या १० ते १२ वर्षांच्या काळात नगरपरिषदेला घनकचरा प्रकल्प उभारणे शक्य झाले नसल्याने कचऱ्याची ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारात कचऱ्याचे ढीगच ढीग तयार झाले असूून, जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच तेथे दररोज कचरा जाळला जात असल्याने निर्माण होणाऱ्या धुराने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अख्ख्या शहराचा हा कचरा डेपो येथून अन्यत्र हटवावा, अशी आग्रही मागणी आता नागरिकांतून होत आहे. दांडेआडोम येथे घनकचरा प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी शहरापासून दांडेआडोम हे अंतर १२ किलोमीटर्सपेक्षा अधिक आहे. त्यामुळे कचऱ्याच्या वाहतुकीवर मोठा खर्च होणार आहे. शहराजवळील कोणत्याही भागात घनकचरा प्रकल्प उभारण्याची चाचपणी केली तरी त्याला त्या भागातून विरोध होत आहे. कारण संपूर्ण शहराचा कचरा आपल्या भागात का? असा प्रश्नही विचारला जात आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात ५ ते १० गुंठे जागेत ७ घनकचरा प्रकल्प उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. अर्थात त्यासाठी प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना पुुढाकार घ्यावा लागणार आहे. परंतु तेथील नागरिकांचा विरोध धुडकावून प्रभागवार घनकचरा प्रकल्पासाठी किती नगरसेवक या कल्पनेला पसंती देतील, याबाबतही साशंकता आहेच. या छोट्या प्रकल्पांमध्ये केवळ कंपोस्ट खतासाठीची प्रक्रिया केली जाईल. ज्याठिकाणी बायोगॅस निर्मिती शक्य आहे तेथे तसे युनिटही उभारले जातील. शहरवासीयांचे या प्रकल्पांसाठी सहकार्य घेतले जाईल. त्यामुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नातही वाढ होईल, असे नगराध्यक्ष मयेकर यांचे म्हणणे आहे. मात्र, हे केवळ सांगूून होणारे काम नाही. त्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांना विश्वासात घ्यावे लागेल. प्रकल्प काय आहे, हे समजावून सांगावे लागेल. शेवटी शहरातील कचरा नष्ट करणे ही केवळ पालिकेचीच जबाबदारी नाही. त्यात नागरिकांचाही सहभाग आवश्यक आहे. अन्यथा प्रकल्प कधीच उभे राहणार नाहीत व कचऱ्याची समस्या अत्यंत गंभीर बनेल. त्यामुळे शासनाच्या व न्यायालयाच्या रोषाला नगरपरिषदेला सामोरे जावे लागणार आहे. सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी, रत्नागिरीतीललोकप्रतिनिधींनी या गंभीर विषयाबाबत तातडीने निर्णय घेऊन शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत ठोसपणे निर्णय घ्यायला हवा. (प्रतिनिधी)
पालिकेला जमलेले नाही
रत्नागिरी शहरात दररोज २२ टन कचरा संकलित केला जातो. मात्र, या कचऱ्याचे करायचे काय, हा प्रश्न अनेकवेळा अनुत्तरीतच राहातो. या कचऱ्याचे प्रमाण पाहता पालिकेला घनकचरा प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक आहे. या परिसरात कचरा प्रकल्प उभारला जाण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू असले तरी घनकचरा प्रकल्प राबविणे पालिकेला शक्य झालेले नाही. घनकचरा प्रकल्प तयार करताना अनेक अडचणी निर्माण होतात. अशा वेळी त्यातून विविध प्रश्न निर्माण होतात. कधी संघर्ष करण्याची वेळ येते.