तंटामुक्त समितीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:29 AM2021-03-21T04:29:33+5:302021-03-21T04:29:33+5:30
दापोली : तालुक्यातील पालगड येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीची सभा ग्रामपंचायतीच्या सभागृहात झाली. समितीचे अध्यक्ष अविनाश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ...
दापोली : तालुक्यातील पालगड येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीची सभा ग्रामपंचायतीच्या सभागृहात झाली. समितीचे अध्यक्ष अविनाश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सरपंच अनिल बेलोसे, उपसरपंच गजानन दळवी, दत्ताराम पाटणे, विलास जाधव, विद्याधर जोशी, विश्वनाथ लोंढे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा
खेड : जिल्हा कुस्ती असोसिएशनतर्फे रत्नागिरीत झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत एलटीटी शाळेतील विद्यार्थी ओंकार दुधाळ याने ४२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला आनंद दुधाळ आणि सुशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
संचिता जाधव हिचे यश
आवाशी : जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत तिसे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील संचिता जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला.
शाळेत गणवेशवाटप
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील निर्व्हाळ येथील श्री स्वामी पुरुषोत्तम शिवमंदिर सेवा मंडळ, कुरणवाडी भक्तगणांकडून निर्व्हाळ आणि मालदोली येथील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
रस्त्याचा प्रश्न मार्गी
लांजा : रिंगणे, अंतोजीवाडी रस्त्याची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने २४६ मीटरच्या रस्त्यासाठी सात लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याने आता हा रस्ता लवकरच केला जाणार आहे. त्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
काजरघाटी संघ विजेता
रत्नागिरी : तोणदे भंडारवाडी येथील सिद्धिविनायक क्रिकेट क्लबच्या वतीने नाइट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे अजिंक्यपद तालुक्यातील काजरघाटी येथील श्री सिद्धिविनायक संघाने पटकावले. विठ्ठल-रखुमाई संघाचा पराभव करून या संघाने विजेतेपद मिळविले.
पन्नास टक्के उपस्थिती
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी खासगी व शासकीय कार्यालये तसेच आस्थापना यांनाही ५० टक्के उपस्थितीचे निर्बंध घालून दिले आहेत. केवळ अत्यावश्यक कार्यालयांना यातून मुक्त केले आहे.
रस्त्याची दुरवस्था
राजापूर : तालुक्यातील साखरीनाटे गावातील मुख्य रस्त्यावरील राजापूर अर्बन बँक नाटे शाखेपासून पुढे हुना मास्तर बंदर रोड रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मात्र, याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा आणि हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
बागायतदार धास्तावले
गुहागर : यावर्षी मार्च महिना संपत आला तरीही म्हणावे तसे अजूनही आंब्याचे पीक आलेले नाही. काही तुरळक झाडांना आलेला मोहोरही गळून पडला आहे. त्यामुळे अद्याप कैरीही धरलेली नाही. काही बागांमध्ये आलेल्या फळांवर हवामानाचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे बागायतदार धास्तावले आहेत.
पंचायत समितीची सभा
राजापूर : येथील पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवार, दिनांक २६ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात सभापती प्रमिला कानडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. यावेळी तालुक्यातील विविध खात्यांचा विभागवार आढावा घेण्यात येणार आहे.