रत्नागिरी गॅस कंपनीत बायाेमेट्रिकवरुन वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:30 AM2021-03-19T04:30:03+5:302021-03-19T04:30:03+5:30
गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पामध्ये दाभोळ वीज प्रकल्पाचे कायमस्वरुपी कामगार आणि कंपनी प्रशासन यांच्यामध्ये ...
गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पामध्ये दाभोळ वीज प्रकल्पाचे कायमस्वरुपी कामगार आणि कंपनी प्रशासन यांच्यामध्ये बायोमेट्रिक थम्बवरुन वाद सुरु झाला आहे. या वादातून १४३ कामगार गेले दोन दिवस कंपनीच्या गेटसमोर उभे आहेत.
दाभोळ वीज प्रकल्पातील कायमस्वरुपी असलेल्या दोनशे कामगारांनी आता आपल्याला रत्नागिरी गॅस प्रकल्पात कायमस्वरुपी सामावून घ्यावे, असा दावा केला आहे. कोल्हापूर कामगार आयुक्तांनी या कामगारांच्या बाजूने निर्णय दिल्याने याविरोधात कंपनी प्रशासनाने मुुंबई उच्च न्यायालयात अपिल केले आहे. याचा निकाल लागेपर्यंत कंपनी व कामगारांमध्ये कोणताही समझोता नको, अशा प्रकारचे निर्बंध लागले आहेत.
मार्च महिन्यामध्ये कंपनी प्रशासनाने कामावर येण्याआधी प्रत्येक कामगारासाठी बायामेट्रिक थम्बचा नियम केला आहे.
बायोमेट्रिक हे युपीएल कंपनीचे आहे. आम्ही रत्नागिरी गॅस कंपनीचे कर्मचारी असल्याने बायोमेट्रिक थम्ब देणार नसल्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे. यातूनच गेले दोन दिवस थम्ब न लावल्याने कामगारांना कंपनी गेटसमोर उभे राहावे लागले आहे. याबाबत अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने कामगार आपल्या निर्णयावर ठाम आहेत.