सिव्हील सर्जनच्या खुर्चीचा वाद पोहोचला किल्लीपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 02:54 PM2020-12-07T14:54:24+5:302020-12-07T14:55:28+5:30
Hospital, Doctor, Ratnagirinews रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सक पदाच्या खुर्चीवरून काही दिवस वाद रंगला होता. हा वाद शमतो न शमतो तोच आता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निवासस्थानाचा वाद रंगू लागला आहे.
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सक पदाच्या खुर्चीवरून काही दिवस वाद रंगला होता. हा वाद शमतो न शमतो तोच आता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निवासस्थानाचा वाद रंगू लागला आहे.
तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी कुलपाची चावी न दिल्याने नवनियुक्त शल्य चिकित्सकांना निवासस्थान वापरता येत नाही. आता या निवासस्थानाचे कुलूप फोडण्यापर्यंत निर्णय झाल्याचे समजते.
तत्कालीन शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांची सोलापूरला विनंती बदली होऊन २ महिने झाले तरी त्यांनी निवासस्थान सोडलेले नाही. रुग्णालय प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही त्यांनी बंगल्याची चावी न दिल्याने नवीन शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.
कोविडचा प्रादुर्भाव वाढलेल्या कालावधीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून वाद सुरू झाला होता. डॉ. बोल्डे शल्य चिकित्सक असताना त्यांचा पदभार डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे देण्यात आला.
यावरून शल्यचिकित्सक पदाची संगीत खुर्ची झाली होती. मात्र, डॉ. बोल्डे यांची याच काळात सोलापूर येथे विनंती बदली झाली, तर डॉ. फुले यांची रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून आरोग्य विभागाने नियुक्ती केली. यामुळे त्या वादावर पडदा पडला.
बोल्डे यांची सोलापूरला बदली झाल्यानंतर ५ ऑक्टोबरला त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. मात्र, दोन महिने झाले तरी त्यांनी शासकीय निवासस्थान सोडलेले नाही. निवासस्थानाची चावी त्यांच्याकडे असल्याने विद्यमान शल्य चिकित्सकांना बंगल्यापासून वंचित राहावे लागले आहे.
चावी मिळत नसल्याने डॉ. फुले यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकार्यांना पत्र देऊन बंगला ताब्यात मिळण्याची विनंती केली आहे. बोल्डे यांनी चावी न दिल्यास वेळप्रसंगी निवासस्थानाचे कुलूप फोडण्याचा निर्णय आता घेण्यात आल्याचेही वृत्त आहे.