चिपळुणात कचरा टाकण्यावरुन वाद, वृद्धावर केले कोयत्याने वार; तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 06:52 PM2022-05-13T18:52:53+5:302022-05-13T18:53:22+5:30
कचरा टाकायचा नाही, जमीन आमची आहे, असे म्हणत दमदाटी करत वार केले.
चिपळूण : तालुक्यातील सावर्डे कुंभारवाडी येथे कचरा टाकण्यावरुन झालेल्या वादावादीत ४९ वर्षीय वृद्धावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद रामचंद्र चव्हाण (रा. सावर्डे, कुंभारवाडी, चिपळूण) यांनी पोलीस स्थानकात दिली. ही घटना काल, गुरुवारी घडली.
रामचंद्र चव्हाण हे कोयत्याने नारळाच्या झावळांचे हिर काढून कचरा टाकत होते. त्यावेळी मारुती चव्हाण, महेश चव्हाण, रोहित चव्हाण (सर्व रा. सावर्डे, कुंभारवाडी, चिपळूण) यांनी कचरा टाकायचा नाही, जमीन आमची आहे, असे म्हणत दमदाटी केली. तसेच मारुती चव्हाण कोयता घेऊन रामचंद्र चव्हाण यांच्या अंगावर धावून गेला. याचवेळी महेश चव्हाण याने त्याच्या हातातील कोयता ओढून घेत रामचंद्र चव्हाण यांच्या डाव्या हाताच्या तीन बोटांवर व डोक्यात मारुन जखमी केले.
रामचंद्र चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन मारुती, महेश, रोहित या तिघांवर भारतीय दंड विधान कलम ३२४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.