आर्थिक व्यवहारावरून वाद; साताऱ्यातील फळविक्रेत्याचे रत्नागिरीतून अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 12:16 PM2024-05-20T12:16:11+5:302024-05-20T12:16:41+5:30
निपाणीतील दोघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी : आर्थिक व्यवहाराच्या वादातून साताऱ्यातील फळविक्रेत्या तरुणाचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना रत्नागिरीतील टीआरपी परिसरात घडली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात इम्रान रौफ बागवान (३०, रा. निपाणी) व त्याचा मित्र अनिल (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) या दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहरणाचा हा प्रकार साेमवारी (१३ मे) रात्री ११:०० ते ११:३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहरानजीकच्या टीआरपी येथील एका हॉटेलसमोरच घडला. याप्रकरणी जहीर शौकत बागवान (३०, रा. पिंपळेश्वर चौक, ता. जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. जहीर बागवान हे फळविक्रेते असून, रत्नागिरीतील अनेक फळ विक्रेत्यांना ते फळे देतात. व्यापाऱ्यांना दिलेल्या मालाचे पैसे घेण्यासाठी ते साेमवारी रत्नागिरीत आले हाेते. निपाणी येथील इम्रान बागवान हेही फळविक्रेते असून, ते जम्मू काश्मीर येथून फळांची खरेदी करून व्यापाऱ्यांना विकतात. त्यांच्याकडून जहीर बागवान यांनीही फळांची खरेदी केली हाेती. त्याचे ६० लाख रुपये ते देणे हाेते.
दरम्यान, साेमवारी रात्री ११:०० ते ११:३० वाजण्याच्या सुमारास जहीर व त्यांचा मित्र आतिक शेख हे दोघे कारमधून रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे जात होते. यावेळी टीआरपी येथील एका हॉटेलसमोर इम्रान रौफ बागवान याने आपली गाडी थांबविली. त्यानंतर इम्रान व त्याचा मित्र अनिल यांनी जहीर यांना त्यांच्या गाडीत बसवून निपाणी येथे नेले. त्यानंतर जहीर यांना कोंडून घालून बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर सोडून देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आपण घाबरल्याने तत्काळ पोलिस स्थानकात तक्रार दिली नाही, असे जहीर बागवान यांनी पाेलिसांना सांगितले. मात्र, त्यांनी शुक्रवारी (१७ मे) रात्री उशिरा रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात याबाबत फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या अपहरणप्रकरणी पाेलिसांनी अद्याप काेणालाही अटक केलेली नाही. अधिक तपास सहायक पाेलिस निरीक्षक विलास जाधव करत आहेत.