गृहिणींमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:37 AM2021-09-04T04:37:44+5:302021-09-04T04:37:44+5:30
चिपळूण : पेट्रोल पाठोपाठ आता घरगुती गॅसही महागला आहे. ऐन कोरोना काळात १५ दिवसांनी दरवाढ होत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय ...
चिपळूण : पेट्रोल पाठोपाठ आता घरगुती गॅसही महागला आहे. ऐन कोरोना काळात १५ दिवसांनी दरवाढ होत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय मेटाकुटीस आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची ऐन कोरोना काळात होणारी भाववाढ सामान्य नागरिकांच्या आर्थिक मुळावर उठणार आहे. त्यातच गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने गृहिणींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
खड्डे बुजवले
गुहागर : गुहागर - वेलदूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत होता. अखेर याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय उपअभियंता सलोनी निकम यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत.
वाहतूक कोंंडी
देवरुख : गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, देवरुख येथील पार्किंग व्यवस्था अद्यापही ‘जैसे थे’च आहे. रस्त्यावरच भाजीवाल्याच्या टपऱ्या असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. रस्त्यावर अतिक्रमण करुन हे भाजीवाले विक्री करत आहेत. त्यामुळे या टपऱ्या गणेशोत्सवापूर्वी हटवाव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.
मशीन दुरुस्ती अभियान
चिपळूण : राष्ट्र सेवा दलाच्या मुंबई शाखेच्या पुढाकाराने पूरग्रस्त चिपळूण भागामध्ये शिवणकाम मशीन दुरुस्तीचे अभियान सुरु झाले आहे. चिपळूण येथील पुरात अनेक शिवण मशिन्स नादुरुस्त झाल्याने अनेक महिला कारागिरांचा व्यवसाय थांबला होता. या कारागिरांना आता या अभियानामुळे दिलासा मिळणार आहे.
ग्रामस्थांना शिधावाटप
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील खडीओझरे येथील गरजू कुटुंबांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, दक्षिण रत्नागिरीच्यावतीने शिधावाटप करण्यात आले. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत खडीओझरे येथील डोंंगर खचल्याने तसेच महापुरामुळे भातशेतीचे नुकसान झाले होते. त्यामुळे येथील १५ गरजू कुटुंबांना शिधावाटप करण्यात आले.