जिल्हाधिकारी मिश्रा यांच्याबद्द्लची नाराजी वाढली; समविचारी मुख्यमंत्र्यासह लाेकायुक्तांकडे करणार तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:39+5:302021-06-26T04:22:39+5:30
रत्नागिरी : रत्नागिरीतील वकील सुरज मोरे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नोटीस दिल्यानंतर त्यापाठोपाठ आता सर्वसामान्य जनतेच्या ...
रत्नागिरी : रत्नागिरीतील वकील सुरज मोरे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नोटीस दिल्यानंतर त्यापाठोपाठ आता सर्वसामान्य जनतेच्या भावना विचारात घेऊन ‘जिल्हाधिकारी हटाव, रत्नागिरी बचाव’ मोहीम महाराष्ट्र समविचारी मंचकडून सुरु करण्यात येत आहे. याविषयीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याची माहिती मंचाचे संजय पुनसकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी मिश्रा यांच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल जनतेच्या मनात कुरबूर सुरु आहे. विशेषतः कोरोनाविषयक प्रशासकीय आरोग्य यंत्रणा राबविण्यात आणि लॉकडाऊन विषयात घेतलेल्या निर्णयातील अदलाबदल त्यायोगे सामान्य माणसे विशेषतः व्यापाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. नेमका हाच धागा पकडून समविचारी मंचने कायदेतज्ज्ञांची मते घेऊन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कोरोना महामारीत घेतलेले निर्णय व अन्य प्रशासकीय बाबी तपासून त्यांची बदली करावी आणि त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह लोकायुक्तांकडे करण्याचे ठरविले असल्याचे समविचारीकडून सांगण्यात आले आहे.
निर्णय प्रक्रियेच्या अदलाबदलासह इतर सर्व विषय घेण्यात येणार असून, सर्वप्रथम बदलीनंतर या विषयांबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समविचारीकडून केली जाईल, असे सांगितले. समविचारीच्या सर्वानुमते घेतलेल्या निर्णयात केशव भट, बाबा ढोल्ये, संजय पुनसकर, नीलेश आखाडे, रघुनंदन भडेकर, राजाराम गावडे, मंदार लेले, रिकी नाईक, विश्वजित कोतवडेकर, सागर खेडेकर, सचिन रायकर, अनिकेत खैर, नवनीत लांजेकर, तन्मय पटवर्धन, प्रवीण नागवेकर, अनिल नागवेकर, अमोल सावंत, आदींचा सहभाग होता.