अपंगांची होतेय हेतुपुरस्सर हेळसांड
By admin | Published: December 1, 2014 10:45 PM2014-12-01T22:45:52+5:302014-12-02T00:23:48+5:30
खेड आगार : एस. टी.कडे ‘व्हील चेअर’ही उपलब्ध नाही
खेड : विविध कारणांनी दिवसेंदिवस होत असलेली महागाई आणि वाढते प्रवासी दर यामुळे अगोदरच मेटाकुटीस आलेली राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस. टी. बस ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी ठरली आहे. मात्र, खेड आगारामध्ये याच सर्वसामान्य अपंगांना बसमध्ये चढउतार करताना किंवा बसस्थानकामध्ये बसपर्यंत जाण्यासाठी ‘व्हीलचेअर’ उपलब्ध नसल्याने हेळसांड होत आहे. खेड आगार त्याबाबत आजही अपंग असल्याचे मत व्यक्त करीत येथील शेकडो अपंगांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे अपंगांसाठी एस. टी. आगारप्रमुखांनी ‘व्हील चेअर’ही उपलब्ध करून देण्याचे सौजन्य दाखविले नाही.
जिल्ह्यातील नऊ आगारांपैकी केवळ चिपळूण आगारात ‘व्हील चेअर’ची सुविधा उपलब्ध आहे. उर्वरित आगारात ही सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक वृध्द आणि अपंग रूग्ण प्रवाशांना आपल्या नातेवाईकांवरच विसंबून राहावे लागत आहे़ जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ सुरू असते. अशा परिस्थितीत चिपळूण आगारामध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सामाजिक उपक्रमात सहभागी होत असलेल्या संस्थेनेच ही ‘व्हील चेअर’ उपलब्ध करून दिली आहे़
तसेच चिपळूण येथील कोकण रेल्वे स्थानकातदेखील ही ‘व्हील चेअर’ उपलब्ध करून देण्यात आली आहे. याखेरीज एकाही आगारामध्ये ही सुविधा नसल्याने अपंगांसह वृध्दांचीही मोठी पंचाईत झाली आहे़
आजही एस. टी.मध्ये आसन क्रमांक ४ ते ६ ही अपंगांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत़ असे असले तरीही गर्दीच्या वेळी आणि घाईघाईमध्ये या अपंगांना गाडीमध्ये चढउतार करताना अवघड होते. त्यांच्या सोबत असलेले नातेवाईक हे इतर प्रवाशी चढल्यानंतर किंवा उतरल्यानंतर त्यांना गाडीत चढवतात व उतरवितात़ अशा वेळी बसस्थानकामध्ये ‘व्हील चेअर’ असल्यास याच अपंगांना चढणे किंवा उतरणे सुलभ होणार आहे़ पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा आगारांमध्ये अशी सुविधा पाहण्यास मिळते़ तेथील अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन तेथील अपंगांसह वृध्द आणि रूग्णांना या सुविधेद्वारे न्याय दिला आहे़ रत्नागिरी विभागामध्ये दरारोज सर्वसाधारणपणे ७५२ एस. टी. बसेसच्या जवळपास ४ हजार ५६० फेऱ्या होतात़
या फेऱ्यांदरम्यान प्रत्येक बसस्थानकामध्ये निदान एक तरी अपंग, रूग्ण किंवा वृध्द हा प्रवासी म्हणून निश्चितच एस. टी.च्या प्रतीक्षेत असतो. अशावेळी या प्रवाशांना ‘व्हील चेअर’ नसल्याने त्यांना बसमध्ये चढणे किंवा उतरणे अवघड होते़ याकरिता प्रत्येक बसस्थानकामध्ये एक तरी ‘व्हील चेअर’ असावी. (प्रतिनिधी)