अद्याप मोफत धान्य मिळाले नसल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:16+5:302021-06-09T04:39:16+5:30
राजापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल सहा महिने, तर दुसऱ्या लाटेत मे आणि जूनचे मोफत धान्य वितरण करून सर्वसामान्य ...
राजापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल सहा महिने, तर दुसऱ्या लाटेत मे आणि जूनचे मोफत धान्य वितरण करून सर्वसामान्य जनतेला केंद्र शासनाने दिलासा दिला आहे. मात्र, राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून केवळ एक म्हणजे मे महिन्याचे मोफत धान्य दिले असून, जूनचे धान्य ग्राहकांना पैसे मोजून खरेदी करावे लागणार आहे.
कोरोनाचे संकट आणि त्यामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. मात्र, या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केंद्र सरकारने केले. प्रधानमंत्री गरीब अन्न धान्य योजनेंतर्गत कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल सहा महिने केंद्राने जनतेला मोफत धान्य पुरविले होते. त्यावेळीही राज्य सरकारने जनतेला वाऱ्यावरच सोडले होते. आता पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारने जनतेसाठी दोन महिने मोफत धान्य वितरणाचा निर्णय जाहीर केला. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील कार्डधारकांना हे धान्य दिले जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारनेही मोफत धान्य देण्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र केंद्राने मे आणि जून या दोन महिन्याचे मोफत धान्य जनतेला दिले असून, त्याचे वितरणही सुरू आहे. मात्र, राज्य सरकारने केवळ मे या एकाच महिन्याचे धान्य मोफत दिले असून, जून महिन्याचे धान्य दिलेले नाही. याबाबत कोणतेचे निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेला जून महिन्याचे धान्य विकत घ्यावे लागणार आहे.
राजापूर तालुक्यात अंत्योदय योजनेंतर्गत ४ हजार ४३१ कार्डधारक असून, प्राधान्य कुटुंब लाभ योजनेंतर्गत २६ हजार ५८५ कार्डधारक व १ लाख ४३ हजार ९६ इतके लाभार्थी आहेत. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या निकषाप्रमाणे प्राधान्य कुटुंब लाभार्थींसाठी प्रतिव्यक्ती तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू याप्रमाणे २९३ टन तांदूळ व १८९ टन गहू उपलब्ध करून दिला आहे, तर अंत्योदय लाभार्थींसाठी जाहीर केलेला प्रतिकार्ड २५ किलो तांदूळ व १० किलो गहू याप्रमाणे ३२ टन तांदूळ व २४ टन गहू उपलब्ध करून दिला आहे. दोन महिन्यांचे धान्य केंद्राने उपलब्ध करून दिले असून, मे महिन्याचे वितरण पूर्ण झाले असून, जूनचे वितरण सुरू आहे. मात्र, राज्य शासनाने जून महिन्यातील मोफत धान्य दिलेले नसल्याने कार्डधारकांना ते आता शासनाने निश्चित केलेल्या किमतीत विकत घ्यावे लागणार आहे. तशी माहिती राजापूर पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.