वावे - मुसाड पेठ रस्त्याच्या कामाबाबत नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:17+5:302021-07-15T04:22:17+5:30
खेड : तालुक्यातील पंधरागाव विभागातील वावे हॉस्पिटल ते मुसाड पेठ या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी काम करण्यात आले आहे. हे काम ...
खेड : तालुक्यातील पंधरागाव विभागातील वावे हॉस्पिटल ते मुसाड पेठ या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी काम करण्यात आले आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करून या कामाची चौकशी करण्याची मागणी पंधरागाव विभागातील जनतेतून करण्यात आली होती. मात्र, त्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
खेड तालुक्यातील पंधरागाव विभागाला चिपळूण तालुक्याशी जोडणारा हा मुख्य व जवळचा रस्ता आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून अंदाजे १५ लाख रुपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, पहिल्या पावसातच योग्य त्या पद्धतीने काम न झाल्याने हा रस्ता जागोजागी उखडला आहे. या कामाचे बिल ठेकेदाराला अदा करण्यात आले असल्याने ठेकेदार दुर्लक्ष करत आहे. अधिकारी कशामुळे रस्ता खराब झाला, याची कारणे देत ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी. ठेकेदाराने वरच्यावर मलमपट्टी केली असून, योग्य त्या पद्धतीने काम न केल्याने रस्त्याची ही अवस्था झाली असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या बोगस कामाची तत्काळ चौकशी करून ठेकेदारासह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विभागातून करण्यात येत आहे.