जिल्हा परिषदेला दुजाभावाची वागणूक : सिंधुदुर्गला ८० डॉक्टर, तर रत्नागिरीला शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 06:04 PM2018-08-14T18:04:10+5:302018-08-14T18:07:11+5:30
शासकीय रूग्णालयांमध्ये वेलनेस क्लिनिकअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० बीएएमएस डॉक्टर्सची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अपुरी संख्या असतानाही एकाही डॉक्टरची भरती करण्यात येणार नाही.
रहिम दलाल
रत्नागिरी : शासकीय रूग्णालयांमध्ये वेलनेस क्लिनिकअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० बीएएमएस डॉक्टर्सची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अपुरी संख्या असतानाही एकाही डॉक्टरची भरती करण्यात येणार नाही. त्यामुळे शासनाकडून रत्नागिरी जिल्हा परिषदेला दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तुटवडा असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत असल्याची ओरड जिल्हाभरात सुरु आहे. त्यासाठी डॉक्टर्सची भरती लवकरात लवकर करावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे.
डॉक्टर्स कमी असल्याप्रकरणी अनेकदा जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेतही जोरदार चर्चा झाली. या मागणीचे ठराव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे पाठविण्यात आलेले आहेत. तरीही शासनाकडून या मागणीची दखल घेतली जात नसून आरोग्याचा खेळ सुरु आहे.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त पदांमुळे त्याचा भार केवळ ९१ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आहे. ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शासनाकडील ६३ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.
रत्नागिरी जिल्हा डोंगराळ आहे. त्याचबरोबर बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्र गावापासून दूर आहेत. त्याचबरोबर या प्राथमिक आरोग्य केंंद्रांच्या शेजारीच त्यांच्या निवासाची सोय करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना राहावे लागते. त्यामुळे अनेक वैद्यकीय अधिकारी अर्धवट सेवा करुन ते निघून गेले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी पुढाकार घेतल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १६ हजार रुपयांच्या मानधनावर २८ बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. ते आजही कार्यरत आहेत. काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना दोन-दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सेवा बजवावी लागते. त्यामुळे रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांमुळे कार्यरत असलेल्यांची तारांबळ उडते.
वेलनेस क्लिनिक योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येत आहे. या योजनेमध्ये राज्यातील १७ जिल्हे घेण्यात आले आहेत. त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० डॉक्टरांची लवकरच भरती करण्यात येणार आहे. मात्र रत्नागिरीचा या योजनेत समावेशच करण्यात आलेला नाही.
रत्नागिरी जिल्ह्याचा समावेशच नाही
रत्नागिरी जिल्हा वेलनेस क्लिनिकमध्ये घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या योजनेतून एकही डॉक्टर भरण्यात येणार नसल्याने रत्नागिरी जिल्ह्याची झोळी रिकामीच राहणार आहे. त्यामुळे शासनाचा जिल्ह्यातील रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरु असून रत्नागिरी जिल्हा परिषदेबाबत दुजाभाव होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.