चिपळुणात ११ हजार विविध दाखल्यांचे वितरण
By admin | Published: July 20, 2014 10:39 PM2014-07-20T22:39:31+5:302014-07-20T22:47:07+5:30
सेतूची कामगिरी : उत्पन्नाचे ६ हजार, जातीचे ३ हजार, आदिवासी ९००, नॉनक्रिमिलेअर १ हजार २००
अडरे : गेल्या तीन महिन्यांमध्ये शहरातील सेतू कार्यालयाअंतर्गत ११ हजार १०० दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक उत्पन्नाचे ६ हजार दाखले वितरण झाले असल्याची माहिती सेतू कार्यालयातून देण्यात आली.
२०१४ - १५ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते. ग्रामीण भागातून येणाऱ्या पालकांना दाखला वेळेत मिळावा, यादृष्टीने संबंधित विभागाकडून योग्य ती पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यावर्षी उत्पन्नाचे ६ हजार, जातीचे ३ हजार, आदिवासी ९००, नॉनक्रिमिलेअर १ हजार २०० अशा एकूण ११ हजार १०० दाखल्यांचा समावेश आहे.
विविध दाखल्यांना होणाऱ्या विलंबाबाबत चिपळूण शिवसेनेनेही योग्य ती दखल घेण्याबाबत संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला होता. विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळाले पाहिजेत. आवश्यक त्या बाबी वेळीच पूर्ण करुन घेण्याची सूचनाही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना लागणारे विविध दाखले वेळेत देण्याच्या दृष्टीने तहसीलदार वृषाली पाटील, प्रांताधिकारी देवेंद्र अंधारे, नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)
चिपळूण तालुक्यात तीन महिन्यांत सेतू अंतर्गत जे दाखले वाटण्यात आले त्याचे कार्य समाधानकारक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. ३ महिन्यात ११ हजार १०० दाखल्यांचे वाटप करण्यात आल्याने गैरसोय दूर झाल्याचे सांगण्यात आले. आवश्यक ते सर्व दाखले यावेळी वाटण्यात आले.
महसूल यंत्रणेने जातीनीशी लक्ष दिल्याने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे व विविध क्षेत्रातील दाखल्यांचे वाटप करण्यात आले. याबाबत विविध पक्षातील नेत्यांनी महसूल यंत्रणेकडे संपर्क साधला होता व त्यानंतर हे दाखले वाटप सुरळीत झाले. त्यामुळे तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात आले.