‘निपिड’ राष्ट्रीय संस्थेतर्फे सविता कामत विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:35 AM2021-08-28T04:35:29+5:302021-08-28T04:35:29+5:30
रत्नागिरी : आविष्कार संस्थेचे सविता कामत विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना मुंबईच्या राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग जनसशक्तिकरण संस्थानातर्फे (NIEPID) शैक्षणिक साहित्य वाटप ...
रत्नागिरी : आविष्कार संस्थेचे सविता कामत विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना मुंबईच्या राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग जनसशक्तिकरण संस्थानातर्फे (NIEPID) शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. संस्थेच्या ज्ञानेश्वर वंडकर प्रार्थनागृहामध्ये शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमासाठी या संस्थेचे इन्स्ट्रक्टर भूषण ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी या शाळेतील विशेष शिक्षकांनी तयार केलेल्या स्वयंसेतू या विशेष प्रालेखाचे प्रकाशन करण्यात आले.
‘निपिड’ ही एक राष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था गेली अनेक वर्षे अक्षम विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. विद्यार्थी ,शिक्षक व पालक यांच्यासाठी अभ्यासक्रम, प्रशिक्षणे तसेच मार्गदर्शनपर पुस्तके, शैक्षणिक उपक्रम, शैक्षणिक साहित्य निर्मिती असे अनेक उपक्रम ही संस्था राबवत असते. याच संस्थेने तयार केलेले शैक्षणिक साहित्य संच अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती परशुराम कदम होते. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अर्चना वाघमळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्याचबरोबर समाज कल्याण विभागाचे दीपक आंबवले, आविष्कार संस्थेच्या सदस्य पद्मजा बापट, मुख्याध्यापिका वैशाली जोशी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मानसी कांबळे यांनी केले. आभार पद्मजा बापट यांनी मानले.
विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम...
याच कार्यक्रमात आविष्कार संस्थेच्या सविता कामत विद्यामंदिरच्या विशेष शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला ‘स्वयंसेतु’ या अभ्यासक्रम प्रालेखाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या समायोजित वर्तनाच्या अनेक प्रमाणित चाचण्या उपलब्ध आहेत. या चाचण्यांमध्ये किवा अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुलांच्या मर्यादांबरोबरच क्षमतांचा विचार करता सर्वसमावेशक अभ्यासक्रमाची गरज लक्षात घेऊन हा ‘स्वयंसेतू प्रालेख तयार केला आहे.
फोटो मजकूर
रत्नागिरीतील आविष्कार संस्थेच्या सविता कामत विद्यालयात मुंबईतील निपिड या राष्ट्रीय संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षण सभापती परशुराम कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, दीपक आंबवले, आविष्कार संस्थेच्या सदस्य पद्मजा बापट, मुख्याध्यापिका वैशाली जाेशी उपस्थित होते. यावेळी कामत विद्यामंदिरमधील विशेष शिक्षकांनी तयार केलेल्या विशेष प्रालेखाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.