रुग्णांना खाद्यपदार्थ वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:27+5:302021-06-26T04:22:27+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोतवडेच्या माध्यमातून श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन कोतवडे इंग्लिश स्कूल, कोतवडे येथे कोविड केअर सेंटरची ...
रत्नागिरी : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोतवडेच्या माध्यमातून श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन कोतवडे इंग्लिश स्कूल, कोतवडे येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. यामधील रुग्णांसाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून नियमित दोन वेळचे जेवण दिले जात आहे.
ऑनलाईन वेबिनार
दापोली : तालुक्यातील दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या प्राे. जी. बी. कुलकर्णी सेंट्रल लायब्ररी येथे वाचन दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. उन्नतीसाठी वाचन असा या कार्यक्रमाचा विषय होता.
किनाऱ्यावर साफसफाईची मागणी
रत्नागिरी : गेट वे ऑफ रत्नागिरी म्हणजेच मांडवी समुद्रकिनाऱ्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरलेली आहे. समुद्रातून आलेल्या प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, कचरा, झाडांच्या फांद्या, तसेच अनेक टाकाऊ वस्तू किनाऱ्यावर अस्ताव्यस्तपणे पडलेल्या आहे. त्यामुळे किनारा साफसफाई करण्याची मागणी होत आहे.
आयसोलेशन केंद्र उपयुक्त
रत्नागिरी : लोकसहभागातून रत्नागिरी तालुक्यातील जयगड पंचक्रोशीत सुरू केलेले कोविड आयसोलेशन केंद्र अनेक गोरगरीब बाधितांसाठी उपयुक्त ठरले आहे. आतापर्यंत या केंद्रातून ६० बाधितांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले आहेत.
कोविड सेंटरला आर्थिक मदत
राजापूर : तालुक्यातील जय गणेश मित्र मंडळ, आडिवरेच्या वतीने धारतळे येथील कोविड सेंटरला आर्थिक मदत करण्यात आली. धारतळे येथे तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारले आहे.
शेतीकडे फिरवली पाठ
मंडणगड : तालुक्यातील गावोगावच्या शेकडो भातशेतीच्या खलाट्या पडीक आहेत. २० खंडापेक्षा अधिक भाताचे हमखास उत्पन्न देणाऱ्या खलाट्या पडीक राहिल्याचे गंभीर चित्र आहे. शेतीची आर्थिक गणिते जुळत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे.
वटपाैर्णिमेला वृक्षाराेपण
चिपळूूण : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे चा संदेश देत पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या पूजा निकम आणि सावर्डे ग्रामपंचायतीचे उपसरपंच जमीर मुल्लाजी यांनी ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षारोपणाने अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
देवरुख : मुंबई उपनगरात वास्तव्याला असलेल्या पोंक्षे परिवारातर्फे आंबव पोंक्षे गावातील ५० कुटुंबीयांना किमान दीड महिना पुरेल इतक्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंसह अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. येथे उत्पन्नाचा पर्याय बंद असल्याने अनेक कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
संदीप कदम यांचा सन्मान
चिपळूण : तालुक्यातील धामणवणे येथील ग्रामसेवक संदीप कदम यांची पिंपळी येथे बदली झाली आहे. यानिमित्त त्यांचा निरोप समारंभ नुकताच धामणवणे ग्रामपंचायतीमध्ये पार पडला. यावेळी त्यांनी गावात केलेल्या कामांची आठवण करून देत ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.