आरोग्य रक्षकांना भेटवस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:20 AM2021-07-12T04:20:38+5:302021-07-12T04:20:38+5:30
देवरूख : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, दक्षिण रत्नागिरीतर्फे आरोग्य रक्षकांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. जनतेच्या गरजा अचूक ...
देवरूख : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, दक्षिण रत्नागिरीतर्फे आरोग्य रक्षकांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
जनतेच्या गरजा अचूक हेरून त्या मार्गी लावण्यासाठी सामाजिक बांधिलकीने जनकल्याण समितीचे कार्य सर्वत्र सुरू आहेत. जे ग्रामीण भाग आहेत, ज्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी जनकल्याण समितीतर्फे आरोग्य पेटी ठेवण्यात आली आहे. दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात ३० ठिकाणी आरोग्य पेटी आहे. गावची बैठक घेऊन वाडीतीलच प्रमुख व्यक्तीची नेमणूक करून, त्यांच्याकडे आरोग्य पेटी देण्यात आल्या आहेत.
समितीतर्फे आयुर्वेदिक औषधे समितीच्या माध्यमातून मोफत दिली जातात. आरोग्य पेटी सांभाळणाऱ्या आरोग्य रक्षकास कोणतेही मानधन दिले जात नाही. सामाजिक व नि:स्वार्थी भावनेने हे आरोग्य रक्षक काम करत असतात. या आरोग्य रक्षकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रतिवर्षी भेटवस्तू दिली जाते. याचप्रमाणे, या वर्षी आरोग्य रक्षकांना बादल्यांचे वाटप करण्यात आले. समितीचे अध्यक्ष गोविंद पटेल व कार्यवाह महेश नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य रक्षकांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली, काटवली, कुळे, किंजळे, ओझरे खुर्द, वाशी येथील आरोग्य रक्षकांना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या आहेत. यावेळी जनकल्याण समितीचे शंकर धामणे व सुरेश करंडे उपस्थित होते.
----------------------------------
जनकल्याण समितीचे शंकर धामणे व सुरेश करंडे यांच्याहस्ते आराेग्य रक्षकांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.