खेर्डी येथे मच्छरदाणी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:38 AM2021-09-17T04:38:01+5:302021-09-17T04:38:01+5:30
चिपळूण : तालुक्यातील खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील एका बेकरीमध्ये एकाच वेळेस नऊ डेंग्यू रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, आरोग्य ...
चिपळूण : तालुक्यातील खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील एका बेकरीमध्ये एकाच वेळेस नऊ डेंग्यू रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, आरोग्य विभागाकडून तत्काळ विविध उपाययोजना राबवून साथ रोग उद्भवणार नाही याची दखल घेण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे खेर्डी येथे जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. संतोष यादव यांच्या हस्ते मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. ज्योती यादव, तालुका आरोग्य पर्यवेक्षक डी. डी. कदम, क्षेत्र कर्मचारी इकबाल चौघुले उपस्थित होते. खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर विविध उपाययोजना राबवून साथीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. खेर्डी औद्योगिक वसाहतीत चार आरोग्य पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. तसेच परिसरातील सर्व इमारती व अन्य वस्तीत कीटकनाशक फवारणी, फाॅगिंग दररोज केले जात आहे. ज्या ठिकाणी डास उत्पती केंद्र आहेत, त्या ठिकाणी टेमीफाॅस (ॲबीट) टाकून डास उत्पती केंद्र नष्ट करण्यात येत आहेत. आणखी काही दिवस या ठिकाणी वरील सर्व उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. संतोष यादव यांनी सांगितले.
चिपळूणमधील पूरपरिस्थितीनंतर मोठ्या प्रमाणात साथीचे रोग पसरण्याची शक्यता होती. मात्र, प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने उत्तमप्रकारे उपाययोजना राबविल्यामुळे पुरानंतरही कोणतीही साथ रोग उद्भवले नसल्याचे ते म्हणाले.