रत्नागिरी जिल्ह्यात पॉस मशीननेच धान्य वितरण : जयकृष्ण फड यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 02:07 PM2018-08-11T14:07:30+5:302018-08-11T14:10:56+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच रास्तदर धान्य दुकानांमध्ये आता पॉस मशीनद्वारेच धान्य वितरण होणार आहे. जेथे नेटवर्कची समस्या होती, तिथेही आॅगस्ट महिन्यापासून पॉसद्वारेच धान्य दिले जाणार आहे. यासाठी आवश्यकतेनुसार शासकीय कर्मचाऱ्यांची रूट नॉमिनी म्हणून नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी सांगितले.
रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्वच रास्तदर धान्य दुकानांमध्ये आता पॉस मशीनद्वारेच धान्य वितरण होणार आहे. जेथे नेटवर्कची समस्या होती, तिथेही आॅगस्ट महिन्यापासून पॉसद्वारेच धान्य दिले जाणार आहे. यासाठी आवश्यकतेनुसार शासकीय कर्मचाऱ्यांची रूट नॉमिनी म्हणून नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी सांगितले.
रास्तदर धान्य दुकानातील वितरण व्यवस्थेत होणारा काळा बाजार रोखण्यासाठी राज्य शासनाने धान्य वितरणामध्येही पॉस मशीनचा वापर करण्याची सक्ती केली. त्यानुसार, पुरवठा विभागाने गेल्या वर्षीपासून या प्रक्रियेला सुरूवात केली. जिल्ह्यातील बहुतांश दुकानात पॉस मशीन बसविले आहेत. सुरूवातीला रेशन दुकानदारांकडून विरोध दर्शविण्यात आला होता. परंतु कमिशन वाढवून दिल्यानंतर त्याला संमती दर्शविली. आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये पॉस मशीनचे वाटप झाले आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुुर्ग जिल्हे डोंगराळ असल्यामुळे कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण झाली होती. बहुतांश ग्रामीण भागात मशीनला रेंज मिळत नसल्याचे दिसून आले. महामार्गाचे काम, बॅटरी बॅकअप आदी समस्याही समोर आल्या. त्यामुळे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी पूर्वीप्रमाणेच अशा ३०२ दुकानांमध्ये धान्य वितरण करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पावतीद्वारे धान्य वाटप सुरू होते.
मात्र, शासनाच्या पुरवठा विभागातर्फे २६ जुलै रोजी सर्वच ई - पॉसद्वारे धान्य वितरणाच्या सूचना दिल्या आहेत. ज्या भागात कनेक्टिव्हिटीची अडचण येणार आहे, त्या भागात आवश्यकतेनुसार स्थानिक स्तरावरील शासकीय कर्मचारी (पोलीसपाटील, तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी आदी) यांची ह्यरूट नॉमिनीह्ण म्हणून नियुक्त करण्याचे आदेश असल्याने पुरवठा विभागाकडून नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे.
जेथे पॉस मशीनद्वारे धान्य वितरणमध्ये अडथळा निर्माण होईल, त्या ठिकाणी पावतीद्वारे धान्य वितरण करून त्यानंतर अधिकृतरित्या त्या ठिकाणी नियुक्त केलेल्या रूट नॉमिनी मार्फत बायोमेट्रिक प्रणालीद्वारे ही माहिती पॉसमध्ये अपलोड केली जाईल.
जिल्ह्यात एकूण ९४३ रेशन दुकाने आहेत. मंडणगड तालुक्यात ४९, दापोलीत ११२, खेडात १२७, गुहागरात ७३, चिपळुणात १४७, संगमेश्वरात १३२, रत्नागिरीत १३६, लांजात ७० तर राजापुरात ९७ रेशनदुकाने आहेत.