भात बियाण्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:23 AM2021-05-31T04:23:02+5:302021-05-31T04:23:02+5:30
पीककर्ज उपलब्ध व्हावे रत्नागिरी : कोरोनामुळे बळीराजा संकटात अडकला आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी बँकांनी ...
पीककर्ज उपलब्ध व्हावे
रत्नागिरी : कोरोनामुळे बळीराजा संकटात अडकला आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी बँकांनी खरीप हंगामातच शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करावे. ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज थकीत असेल तर त्यांना शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
खते, बियाण्याची खरेदी
रत्नागिरी : खरीप हंगामासाठी भात, नागलीचे बियाणे खरेदी करण्यात येत आहे. शिवाय खरीप हंगामासाठी लागणारी खत खरेदी सुरू केली आहे. विविध सहकारी सोसायटींमध्ये खते, बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. ‘एक काडी’चे बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल सर्वाधिक आहे.
ऑनलाईन मार्गदर्शन
रत्नागिरी : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी काही शाळा, महाविद्यालये तसेच खासगी क्लासेसव्दारे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू झाले आहेत. गुगल, झूम अॅपचा त्यासाठी वापर केला जात आहे.
बाजारात खरेदीसाठी गर्दी
रत्नागिरी : सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची विक्री होत असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. पावसाळी बांधकामे तसेच दुरूस्तीसाठी परवानगी असल्याने लागणाऱ्या साहित्याची खरेदी प्राधान्याने होत आहे. प्लास्टिक पेपर, रेनकोट, पन्हळ, पत्रे याशिवाय शेतीची अवजारे खरेदी करण्यात येत आहेत.
गप्पी मासे पैदास केंद्र
रत्नागिरी : जिल्ह्यात अडीचशेपेक्षा अधिक ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्र सुरू असून, त्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयाकडून होत आहे. जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया आदी साथी पसरू नयेत, यासाठी हिवताप कार्यालय खबरदारी घेत आहे.
कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड
रत्नागिरी : तालुक्यातील ग्रामपंचायतीतर्फे ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यासाठी ग्रामनिधीतून खर्च केला जात आहे. कोरोनापासून संरक्षण व्हावे, यासाठी गावागावातून ग्रामस्थांसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
बीएसएनएलचा बोजवारा
रत्नागिरी : गावोगावी, वाडीवस्त्यांवर भारत संचार निगमची रेंज पोहोचली आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या ताैक्ते वादळामुळे भारत संचार निगमच्या सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. शहरी व लगतच्या भागातील सेवा पूर्ववत झाली असली, तरी ग्रामीण भागातील सेवा अद्याप विस्कळीतच आहे.
रक्तदान शिबिर
रत्नागिरी : कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांना उपचारासाठी रक्ताची गरज आहे. त्यासाठी विविध सामाजिक संस्था, निरनिराळ्या समाजांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्यासाठी रक्तदात्यांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे.
ग्रामकृती दल सक्रिय
रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राम कृती दल व वाडी कृती दलांना जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक गावातील ग्रामकृती दले सक्रिय झाली आहेत. ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ आरोग्य सर्वेक्षण अभियानांतर्गत घरोघरी जावून तपासणी करून आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
कार्यालये अजूनही शांतच
रत्नागिरी : शासकीय कार्यालयांमध्ये कोराेनामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती अद्याप आहे. शहरातील मुख्य कार्यालयात कामासाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आवश्यक कामाव्यतिरिक्त येऊ नये, अशा सूचना कार्यालयाबाहेर लावण्यात आल्या आहेत.
आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू
रत्नागिरी : शासकीय, निमशासकीय कार्यालयात दि. १ जूनपासून आपत्ती निवारण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. महापूर, दरड कोसळणे, आदी नैसर्गिक संकटे पावसाळ्यात उद्भवतात. या संकटांचा सविस्तर अहवाल तत्काळ उपलब्ध करून घेण्यासाठी सलग चार महिने आपत्ती निवारण कक्ष कार्यरत राहणार आहे.