गणवेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:30 AM2021-03-18T04:30:56+5:302021-03-18T04:30:56+5:30
रामपूर : चिपळूण तालुक्यातील निर्व्हाळ येथील श्री स्वामी पुरुषोत्तम शिवमंदिर सेवा मंडळ, कुरणवाडी भक्तगणांकडून निर्व्हाळ आणि मालघर प्राथमिक शाळेतील ...
रामपूर : चिपळूण तालुक्यातील निर्व्हाळ येथील श्री स्वामी पुरुषोत्तम शिवमंदिर सेवा मंडळ, कुरणवाडी भक्तगणांकडून निर्व्हाळ आणि मालघर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. शिक्षक अशोक धनावडे यांनी हे गणवेश स्वीकारले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
पाण्यासाठी पायपीट
मंडणगड : मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील दुर्गम भागात पाणीटंचाई तीव्र होऊ लागली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. ग्रामीण महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करुन पाणी आणावे लागत आहे.
जातपडताळणी विशेष मोहीम
रत्नागिरी : शैक्षणिक, सेवा निवडणूक व इतर कारणांसाठी २०२०-२१ या वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आली आहे. अर्जदारांचे नुकसान होऊ नये, त्यांना वेळेत जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, या उद्देशाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना १५ ते ३० मार्च या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिमगोत्सव कार्यक्रम
रत्नागिरी : रत्नागिरीचे आराध्य दैवत असलेल्या भगवतीदेवीचा शिमगोत्सव कोरोनाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करून ५० जणांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. शिमगा उत्सवाची ही सभा नुकतीच झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. २८ मार्चपासून शिमगोत्सवाला प्रारंभ होणार आहे. हा उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उपोषणाचा इशारा
खेड : घेरा रसाळगड भराडे धनगरवाडीला जोडणारा रस्ता बांध घालून अडविण्यात आला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना ये-जा करताना अडचण होत आहे. या प्रकरणी महाराणी अहिल्यादेवी समाजप्रबोधन मंचतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. हा रस्ता खुला न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा मंचने दिला आहे.
गटारांमुळे दुर्गंधी
दापोली : शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील अनेक गटारे कित्येक दिवसांपासून तुंबलेली आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवासी आणि नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पालख्यांचे दर्शन मिळणार
लांजा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने शिमगोत्सवावर काही निर्बंध आणले होते. यात पालख्यांना घरोघरी नेण्यास मनाई करण्यात आली होती, परंतु जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घरोघरी पालखीच्या दर्शनाला परवानगी दिल्याने, आता भाविकांना पालखीचे दर्शन होणार आहे.