नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्ण सज्जता : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:30 AM2021-05-16T04:30:59+5:302021-05-16T04:30:59+5:30

रत्नागिरी : काही तासांवर आलेल्या ताउते संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन ...

District administration fully prepared to face natural calamity: Uday Samant | नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्ण सज्जता : उदय सामंत

नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्ण सज्जता : उदय सामंत

Next

रत्नागिरी : काही तासांवर आलेल्या ताउते संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज रहाण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी आयाेजित केलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जिल्ह्यात रत्नागिरी, दापोली, गुहागर आणि राजापूर तालुक्यांमधील किनाऱ्यालगत असलेल्या २७६ गावांना अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाला जेमतेम वर्षही पूर्ण झाले नाही. तोपर्यंत आता तोक्ते चक्रीवादळाचे संकट कोकणावर आले आहे. निसर्ग वादळाच्या वेळच्या परिस्थितीचा अनुभव असल्याने जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, दापोली, गुहागर आणि राजापूर या तालुक्यांना या वादळाचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने वादळाची तीव्रता वाढल्यास अत्यावश्यक परिस्थितीत कच्च्या घरात रहाणाऱ्या नागरिकांचे तत्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही सामंत यांनी यावेळी केले.

राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रतिसाद दल (एन. डी. आर. ए.) पथकाशी जिल्हा प्रशासनाचा सतत संपर्क सुरू आहे. सध्या हे पथक गोवा आणि पुणे येथे आहे. आपत्ती उद्भवल्यास त्यांना तातडीने पाचारण करता येईल. आपत्तीवेळी दळणवळण थांबले, मार्ग बंद झाले तर अशावेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी कटर, जेसीबी आदी अत्यावश्यक यंत्रसामग्री तयार ठेवण्याच्या सूचना तहसीलदार तसेच त्यांच्या सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

शनिवारी सायंकाळी ६ वाजता हे चक्रीवादळ सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. मध्यरात्री राजापूर तसेच पहाटेच्या सुमारास रत्नागिरीच्या किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या वादळाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र, नागरिकांनीही हे संकट लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी, असे आवाहनही

मंत्री सामंत यांनी यावेळी केले.

चार तालुक्यांतील २७६ गावांना फटका

समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि गुहागर या चार तालुक्यांमधील किनारी भागात वसलेल्या गावांना या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या तालुक्यांमधील किनाऱ्यांलगत ० ते ५ किलोमीटरच्या अंतरावर वसलेल्या रत्नागिरीतील १०४, दापोलीतील ६८, गुहागरमधील ५१ आणि राजापूर तालुक्यातील ५३ गावांना तडाखा बसणार असल्याने येथील यंत्रणांना अतिदक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कडक निर्बंधांबाबत चर्चा करणार

जिल्ह्यात कडक निर्बंधांबाबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत लाॅकडाऊन आहे तसाच सुरू ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अद्याप काही निर्णय नाही. ग्रामीण भागात कोरोना जास्त पसरला असला तरी तिथे कडक लाॅकडाऊन करणे उपयोगी नाही. या सर्व बाजूने विचार करूनच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सामंत म्हणाले.

एमआयडीसी बंद करण्याचा निर्णय अद्याप नाही

एमआयडीसीतील अनेक उद्योजकांनी स्वत:ची कोरोना केअर सेंटर उभारली आहेत. त्यांच्या खर्चाने कोरोना चाचण्याही हाेत आहेत. त्यामुळे सध्या तरी एमआयडीसी बंद करण्याची गरज वाटत नाही.

लोकवस्तीत उभारलेल्या कोविड रुग्णालयाबाबत कारवाई

शहरातील साळवी स्टाॅप येथे लोकवस्तीत सुरू केलेल्या कोविड रुग्णालयाबाबतची तक्रार आपल्याकडे एका नगरसेविकेने केली आहे. चक्रीवादळाचे संकट गेल्यावर याप्रकरणीही दखल घेऊन कारवाई केली जाईल, असे सामंत यांनी सांगितले.

Web Title: District administration fully prepared to face natural calamity: Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.