जिल्हा बॅँक ‘टार्गेट’चा प्रयत्न

By admin | Published: December 29, 2016 11:01 PM2016-12-29T23:01:01+5:302016-12-29T23:01:01+5:30

तानाजी चोरगे : साप-साप म्हणून भुई धोपटली, खरे साप अद्यापही मोकाटच

District Bank 'Target' Trial | जिल्हा बॅँक ‘टार्गेट’चा प्रयत्न

जिल्हा बॅँक ‘टार्गेट’चा प्रयत्न

Next

रत्नागिरी : जुन्या चलनातील नोटांच्या व्यवहारांबाबत नियमानुसार कामकाज करूनही रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील व्यवहारांची नाबार्ड, प्राप्तिकर व सीबीआयकडून तपासणी करण्यात आली. त्यात आक्षेपार्ह असे काहीही सापडले नाही. सहकारी बॅँकांना टार्गेट करण्याचा हा प्रकार असून, नको तेथे ‘साप-साप’ म्हणून धोपटले जात आहे. खरे साप मात्र मोकाटच आहेत, असा टोला जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत लगावला. राज्यातील काही सहकारी बॅँकांकडे १५ नोव्हेंबरनंतर स्वीकारलेल्या जुन्या चलनातील पाच हजार कोटींच्या नोटा पडून आहेत. रत्नागिरी मध्यवर्ती बॅँकेने जमा झालेल्या जुन्या चलनातील ११२ कोटी ८३ लाख ९५ हजारांच्या जुन्या नोटा रिझर्व बॅँकेच्या आदेशानुसार तत्काळ १५ नोव्हेंबरलाच स्टेट बॅँकेत जमा केल्या होत्या. त्यामुळे आता बॅँकेकडे एकही जुनी नोट शिल्लक नाही. याबाबतच्या सर्व व्यवहारांची नाबार्डच्या पथकाने बॅँकेत व शाखांमध्ये येऊन तपासणी केली होती. त्यानंतर प्राप्तिकर विभागाला व्यवहारांबाबतचा तपशीलवार अहवाल पाठविला. तरीही सीबीआयची तपासणी करण्यात आली. त्यानंतरही आक्षेपार्ह काहीच सापडले नाही. नियमबाह्य काहीच नसतानाही तीन यंत्रणांकडून तपास करण्यात आल्याने बॅँकेच्या विश्वासार्हतेबाबत लोकांमध्ये साशंकता निर्माण होऊ शकते. अर्थात रत्नागिरी जिल्हा बॅँकेच्या ग्राहकांचा बॅँकेवर विश्वास आहे. त्यामुळेच नोटाबंदीनंतरही आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाला नाही. उलट जिल्हा बॅँकेच्या ठेवींमध्ये वाढच झाली असल्याचे चोरगे म्हणाले. जिल्हा बॅँकेकडे आजघडीला १५५६ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. ३२ हजार रुपे कार्ड वितरीत करण्यात आली आहेत. या काळात ४० कोटींचे कर्जवितरण करण्यात आले. नियमितपणे व्यवहार होत नसलेली १९ हजार ९९० खाती गोठविण्यात आली आहेत. ही खाती बंदच केली जाणार आहेत. ७८ पैकी जिल्ह्यातील १९ शाखा १०० टक्के केवायसी पूर्ण झालेल्या आहेत. अन्य शाखांमधील केवायसी पूर्णत्वाची मोहीम सुरू आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी) नियमांचे तंतोतंत पालन जिल्हा बॅँक ही परवानाधारक असून, रिझर्व बॅँक व केंद्राच्या कायद्यानुसार बॅँकेचा कारभार चालतो. त्यांचे आदेश बॅँकेला बंधनकारक आहेत. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयानंतर चार दिवस जुन्या नोटा स्वीकारल्यानंतर रिझर्व बॅँकेच्या आदेशानुसार जुन्या नोटा स्वीकारणे तत्काळ बंद करण्यात आले. अर्बन बॅँका व नागरी पतसंस्थांव्यतिरिक्त जुन्या चलनातील मोठी रक्कम कोणीही जिल्हा बॅँकेत जमा केलेली नाही. त्यानुसार जुन्या नोटांच्या व्यवहाराबाबत नाबार्डकडून तपासणीत काहीच आक्षेपार्ह सापडले नाही. प्राप्तिकर विभागाला व्यवहारांबाबतचा अहवाल सादर केला. तरीही पुन्हा सीबीआयकडून तपासणी करण्यात आली. त्यामुळे बॅँकेबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले त्याची भरपाई कोण करणार, असा सवालही त्यांनी केला. खात्यांमध्ये जमा झालेली मोठी रक्कम ही खरोखरच संबंधित पतसंस्था, व्यक्तीने खात्यात भरली आहे काय, याची पडताळणी तपासणीत करण्यात आली. जनधनच्या ७५०० खात्यांची तपासणी जुन्या चलनातील ५० हजारच्या नोटा जमा करणाऱ्यांची खातीही तपासली. जास्त रक्कम भरलेल्या खात्यांची केवायसी तपासली. कॅशलेस व्यवस्थाही जिल्हा बॅँकेने अमलात आणली. कॅशलेस व्यवहार करणारे सावर्डेतील सिद्धार्थ शंभरकर व कुवारबाव, रत्नागिरीतील विजय कांबळे या बॅँकेच्या खातेदारांना सरकारच्या योजनेतील बक्षीसही मिळाले. गेल्या ५० दिवसांत अनेक अडचणी आल्या तरीही ग्राहकांची समजूत काढून कमी प्रमाणात उपलब्ध झालेल्या नवीन चलनातून सर्वांची गरज भागविली.

Web Title: District Bank 'Target' Trial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.