जिल्हा बँकेच्या खातेदारांचा मोर्चा
By admin | Published: November 16, 2016 10:28 PM2016-11-16T22:28:46+5:302016-11-16T23:30:47+5:30
तीव्र असंतोष : ग्रामीण भागाचे अर्थकारण कोलमडल्याने संताप
चिपळूण : शासनाच्या धोरणानुसार १००० व ५०० रुपयांच्या नोटा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत स्वीकारल्या जात नसल्याने ग्रामीण भागाचे अर्थकारण अडचणीत आले आहे. जनतेची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या संतप्त ग्राहकांनी बुधवारी सकाळी बँकेच्या चिपळूण शिवाजी चौक शाखेवर मोर्चा काढला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कल्पना जगताप- भोसले व तहसीलदार जीवन देसाई यांना निवेदन दिले.
चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे व ग्रामीण लघुउद्योजकांचे व ग्रामीण कारागीरांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सभासदांनी आज मोर्चा काढला. त्यांनी प्रथम ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याबद्दल चिपळूण शिवाजी चौक येथील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा कार्यालयावर धडक दिली. तेथे कर्जाचे हप्ते भरण्यासाठीही नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे शाखा अधिकारी यांनी सांगितले.
ग्रामीण भागात बँकेकडून कर्ज घेऊन शेती व उद्योग, व्यवसाय केले जातात. त्या कर्जाचे हप्ते जिल्हा बँकेत भरले जातात. परंतु, जिल्हा बँकेत नोटा स्वीकारल्या जात नाहीत. केंद्र शासनाने सर्व बँकातून ३० डिसेंबरपूर्वी रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिलेले असताना जिल्हा बँक नोटा का स्वीकारत नाही, असा प्रश्न या सर्व खातेदारांनी उपस्थित केला आहे.
ग्रामीण भागातील अनेक खातेदारांची इतर बँकांत बचत खाती नाहीत. अशा परिस्थितीत या ग्राहकांनी नोटा भरायच्या कुठे? शिवाय कर्जाचे हप्ते न फेडल्याने दंड व्याज वाढणार. त्यामुळे या ग्राहकांना मानसिक त्रास होत आहे. १००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची जिल्हा बँकेला परवानगी द्यावी, अशी आपली मागणी असून, ती रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडे कळवावी, अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांना देण्यात आले.
सकाळी बँक खातेदार ग्राहकांच्या वतीने प्रभाकर आरेकर, अशोक कदम, रघुनाथ कुंभार, शंकर येलोंडे, रामचंद्र पडवले, हनुमंत पवार, दिलीप गमरे, शिवाजी गोटल, अंकुश कदम, राकेश जाधव, शिवाजी चिले, कालवे, श्रीधर शिंदे यांच्यासह विविध सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, संचालक, पतसंस्थांचे संचालक तसेच जिल्हा बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चिपळूणचे उपविभागीय अधिकारी भोसले व तहसीलदार देसाई यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)
प्रांत व तहसीलदारांना दिले निवेदन.
१००० व ५०० नोटा जिल्हा बँक स्वीकारत नसल्याने अडचणीत वाढ.
ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडले.
ग्रामीण जनतेची होतेय ससेहोलपट.
जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये १००० व ५००च्या नोटा स्वीकारण्याची मागणी.
खातेदार, पतसंस्था, खविसंचे व सोसायट्यांचे संचालक उतरले रस्त्यावर.