जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर, सर्व जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल उभे करण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 12:50 PM2021-10-17T12:50:16+5:302021-10-17T12:53:38+5:30
चिपळूण : महिनाभरावर येऊन ठेपलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेल करण्याच्या राष्ट्रवादीच्या डॉ. तानाजीराव चोरगे यांना राष्ट्रवादीतूनच ...
चिपळूण : महिनाभरावर येऊन ठेपलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेल करण्याच्या राष्ट्रवादीच्या डॉ. तानाजीराव चोरगे यांना राष्ट्रवादीतूनच घरचा आहेर मिळाला आहे. सर्वपक्षीय नेलसमोर सर्वच्या सर्व २१ जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे चिपळूण तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
रत्नागिरी जिल्हा बँक निवडणूक नेहमीच या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. मागील निवडणुकीत माजी आमदार रमेश कदम यांनी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलची कोंडी केली होती. यावेळीही राष्ट्रवादीला पुन्हा घरचा आहेर मिळाला आहे. आता १९ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेल रिंगणात आहे.
निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला आहे. मात्र त्याला राष्ट्रवादीतूनच विरोध झाला आहे. चोरगे यांच्या नेलमध्ये चिपळूण तालुक्यातून खुद्द तानाजीराव चोरगे, आमदार शेखर निकम व जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर या उमेदवार आहेत. असे असताना चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी या निवडणूक रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक पॅनल उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी चोरगे यांच्या एकतर्फी कारभारावरही ताशेरे ओढले आहेत. जिल्हा बँकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूरस्कृत उमेदवार जाहीर करताना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलेले नाही. त्याच त्याच उमेदवारांना पुन्हा पुन्हा संधी दिली जाते. असा आरोप त्यांनी केला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला संघटनेच्या चित्रा चव्हाण, माजी नगरसेविका सीमा चाळके, दिपाली नाटकर, अविनाश हरदारे आदी उपस्थित होते.