विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा
By Admin | Published: December 30, 2014 09:43 PM2014-12-30T21:43:14+5:302014-12-30T23:34:47+5:30
पाण्याचे दुर्भिक्ष्य : पाणीच नसल्याने विद्यार्थ्यांना सुटी
रत्नागिरी : नाचणे येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची पाईपलाईन गंजली आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने आठवड्यातून तीन ते चार वेळा हजेरी घेऊन विद्यार्थ्यांना सुटी देण्यात येत आहे. संबंधित प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडला असून, शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत आयटीआय प्रशासन हतबल झाल्याने आज या विद्यार्थ्यांनीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पाईपलाईनची दुरूस्ती होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल, असा दिलासा दिला आहे.
शहरातील नाचणे येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची पाईपलाईन अनेक वर्षांपासून गंजलेली आहे. त्यामुळे संस्थेला पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना कल्पना दिली होती. मात्र, आयटीआय प्रशासनाने याबाबत हतबलता दर्शवीत आपण नगरपरिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केला असून, जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिल्याचे या विद्यार्थ्यांना सांगितले. अधूनमधून आयटीआय प्रशासनाकडून एखादा टँकर मागवला जात होता. मात्र, त्याद्वारे मिळणारे पाणी अपुरे असेच आहे. आता तर या मुलांना पाण्याची समस्या अधिकच भेडसावू लागली आहे. गंजलेल्या पाईपलाईनमुळे सुमारे ८०० ते ९०० विद्यार्थ्यांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. त्यामुळे आठवड्यातून तीन ते चार वेळा हजेरी घेऊन विद्यार्थ्यांना सुटी देण्यात येत आहे. वसतिगृहात असलेल्या ४० मुलांची समस्या तर अधिकच बिकट आहे. त्यांना पाण्याअभावी जेवणासह सर्वच बाबतीत गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. संबंधित प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडला असून, शैक्षणिक नुकसान होत आहे.
अखेर आज सुमारे ३५० विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकले. यावेळी पाच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या या समस्येबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या मुलांची समस्या ऐकून घेतली. आयटीआय प्रशासनाने पाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी तयार केलेल्या प्रस्तावात त्रुटी आहेत. त्यामुळे ही पाईपलाईन बदलण्यास विलंब होईल. अर्थात त्यासाठी लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी यात स्वत: लक्ष घालण्यात येईल. असे त्यांनी सांगितले. तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी संबंधित विभागाला त्वरित आदेश काढण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनीच ही जबाबदारी घेतल्याने या विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. (प्रतिनिधी)