परिवहनमंत्रीच पालक, तरीही रत्नागिरीचे बसस्थानक अनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 06:03 PM2022-02-14T18:03:47+5:302022-02-14T18:04:13+5:30
जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याकडेच परिवहन खाते असूनही रत्नागिरी बसस्थानकाच्या पूर्णत्वाला मुहूर्त सापडत नाही, याचेच आश्चर्य वाटते.
रत्नागिरी : रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे बिल प्राप्त न झाल्याने गेली काही वर्षे या प्रकल्पाचे काम रखडले आहे. दोनवेळा भूमिपूजन झालेल्या या बसस्थानकाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, दोनवेळा सरकार बदलले तरी काम रखडले असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याकडेच परिवहन खाते असूनही रत्नागिरी बसस्थानकाच्या पूर्णत्वाला मुहूर्त सापडत नाही, याचेच आश्चर्य वाटते.
आघाडी सरकारच्या काळात हायटेक बसस्थानकास परवानगी मिळाली होती. ‘बांधा व हस्तांतरण करा’ या तत्त्वावर बसस्थानक बांधण्यात येणार होते. मात्र, त्यानंतर राज्यात युतीचे सरकार आले. तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी ‘बीओटी’ तत्त्वावरील बसस्थानक बांधण्याचे काम रद्द करून महामंडळाकडून बसस्थानक बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला.
प्रस्तावित इमारतीच्या आराखड्यात बदल करण्याच्या सूचना तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केल्या. त्यानुसार नूतन आराखडा तयार करण्यात आला. नूतन इमारतीच्या हायटेक प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात झाली. परंतु, कोरोनाचा अडसर आला आणि त्यानंतर रेंगाळलेल्या कामाला अद्याप गती मिळालेली नाही.
कोरोना महामारीमुळे कामाला ब्रेक लागला. कामगार मिळत नसल्याने काम रखडले. तसेच ठेकेदाराचे ४० लाखांचे बिलही थकले आहे. त्यामुळे हा १० कोटींच्या नूतन बसस्थानकाचे काम सध्या तरी ठप्प आहे. रखडलेल्या या कामामुळे वाहतूक व्यवस्था काहीशी विस्कळीत झाली आहे. एसटी थांब्यालाही जागा नसल्याने रस्त्यावर प्रवाशांना उभे राहावे लागत आहे.
राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे जिल्ह्याचे ‘पालकत्व’ आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकालात या कामाला गती मिळेल अशी आशा हाेती. मात्र, पालकमंत्र्यांचेही प्रयत्न ताेकडे पडत असल्याचे सद्य:स्थितीत दिसत आहे. दाेन वर्षात कामाला गती न मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातीलच बसस्थानक जणू अनाथ झाले आहे.
आश्वासने दिले पुढे काय?
परिवहन मंत्री अनिल परब यांनी २६ जानेवारी राेजी अर्धवट कामाची पाहणी करून कामाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले हाेते. तत्पूर्वी, ठेकेदाराला १० कोटी रुपये देऊन बसस्थानकाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले, पण निघून गेल्यावर काम ‘जैसे थे’च राहिले आहे.
कामाला सुरुवात : २०२०
अंदाजित रक्कम : १० काेटी
ठेकेदाराचे थकले : ४० लाख