जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले
By admin | Published: October 9, 2016 11:23 PM2016-10-09T23:23:22+5:302016-10-09T23:23:22+5:30
भातपिकाचे नुकसान : जनजीवन विस्कळीत; लांजा तालुक्यात काही गावांचा वीज पुरवठा खंडित
रत्नागिरी : परतीच्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जोर धरला असून रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात रविवारी दिवसभर संतंतधार सुरू होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे कोठेही पडझड झाल्याचे वृत्त नसले तरी भातशेतीला मोठा फटका बसला आहे.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी रात्री जोरदार पुनरागमन केले. मध्यरात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत अव्याहतपणे पाऊस बरसत होता. सध्या नवरात्रौत्सवानिमित्त सर्वत्र दांडिया रंगू लागले असतानाच या पावसामुळे महिला व नागरिकांचा हिरमोड झाला. रविवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. चिपळूण शहरासह तालुक्यात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. मात्र, पावसाचा म्हणावा तसा जोर नसल्याने दिवसभर ढगाळ वातावरण होते. राजापूर तालुक्यात दिवसभर किरकोळ सरी बरसल्या. लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र जोरदार पाऊस बरसत होता. पहाटेपासून सुरू झालेला पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत बरसत होता. त्यामुळे तालुक्यातील काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. संगमेश्वर तालुक्यातील देवरूख, बावनदी, उक्षी, आदी परिसरातही रविवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागात मुसळधार पाऊस बरसत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गुहागर, मंडणगड, खेड तालुक्यांतही रविवारी पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झाले होते. दापोली परिसरात रविवारी सकाळी मुसळधार पाऊस बरसला. मात्र, सायंकाळी पावसाचा जोर ओसरला.
भातशेतीची वाताहत
जिल्ह्यात हळव्या जातीचे भात ४० टक्के, निमगरव्या जातीचे ४० टक्के, तर गरव्या जातीच्या भाताची लागवड २० टक्के क्षेत्रावर करण्यात आली आहे. हळवे भात तयार झाले असून, शेतकऱ्यांनी कापणीस प्रारंभ केला आहे. घटस्थापनेपूर्वी पाऊस चांगला बरसला होता. घटस्थापनेनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली होती, परंतु रविवारी सकाळपासून दिवसभर मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. शनिवारी कापलेले भात पाण्यावर तरंगू लागल्याचे विदारक दृश्य आता दिसू लागले आहे. निमगरवे भातदेखील तयार झाले असून, त्यामुळे या भातशेतीलाही पावसाचा फटका बसला आहे.
गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस
गतवर्षी सरासरी दोन हजार ७५४.२९ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता, परंतु यावर्षी आतापर्यंत चार हजार १५५.७२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यंदाचा पाऊस दुप्पट असल्याचे दिसून येते.