जिल्हा रुग्णालय अखेर काेरोना रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:29 AM2021-04-13T04:29:41+5:302021-04-13T17:33:40+5:30
CoronaVirus Ratnagiri Hospital : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या भरमसाट वाढू लागल्याने जिल्हा महिला रुग्णालय अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे आता पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालय कोविड रुग्णालय करण्यात आल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी रविवारी रात्री जाहीर केले आहे. त्याचबरोबर आता वाढत्या रुग्णसंख्येसाठी आरोग्य यंत्रणेत जादा मनुष्यबळाची गरज असल्याने जिल्हा महिला रुग्णालय व जिल्हा रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांसाठी मानधन तत्त्वावर काही पदे भरण्यात येणार आहेत.
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या भरमसाट वाढू लागल्याने जिल्हा महिला रुग्णालय अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे आता पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालय कोविड रुग्णालय करण्यात आल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी रविवारी रात्री जाहीर केले आहे. त्याचबरोबर आता वाढत्या रुग्णसंख्येसाठी आरोग्य यंत्रणेत जादा मनुष्यबळाची गरज असल्याने जिल्हा महिला रुग्णालय व जिल्हा रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांसाठी मानधन तत्त्वावर काही पदे भरण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १३ हजार आणि कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या ४०० पर्यंत पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १ हजारच्या आसपास पोहोचली आहे. सध्या यात अधिकच भर पडू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण अधिकच वाढला आहे. सध्या लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभाग कार्यरत असतानाच आता कोरोनाचा संसर्गही वेगाने पसरू लागला आहे. दिवसाला २०० ते २५० रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू आहे.
गेल्या जून-जुलै महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागताच जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून सुरू करण्यात आले होते. त्यानंतरही रुग्ण वाढू लागल्याने तसेच अन्य रुग्णांची गैरसोय होऊ लागल्याने नगर परिषदेच्या दवाखान्यात बाह्य रुग्ण विभाग सुरू करून जिल्हा रुग्णालयाबरोबरच जिल्हा महिला रुग्णालय तातडीने कोरोना रुग्णालय म्हणून सुरू करण्यात आले होते.
डिसेंबर महिन्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालय नाॅन कोविड रुग्णालय करण्यात आले. मात्र, जिल्हा महिला रुग्णालय अजूनही कोविड रुग्णालय म्हणून कार्यरत आहे. सध्या या रुग्णालयात १४० खाटा कोरोना रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, सध्या कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने महिला रुग्णालयाची क्षमता कमी पडू लागली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय हेही कोविड रुग्णालय करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात येत होती.
त्यानुसार जिल्हा प्रशासनाने महिला रुग्णालयाबरोबरच जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही रुग्णालयांत डाॅक्टर्स, परिचारिका यांचीही संख्या वाढविणे गरजेचे आहे. या पदांची मानधन तत्त्वावर भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार वर्ग १ वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस., मानधन प्रत्येकी ६० हजार), बी.ए.एम.एस. आणि बी.एच.एम.एस. (मानधन प्रत्येकी २८ हजार), स्वच्छता सेवेसाठी कर्मचारी (मानधन रुपये प्रतिदिन), वर्ग ३ संवर्गातील अधिपरिचारिका (जी.एन.एम., मानधन प्रति महिना २० हजार), ए.एन.एम. (मानधन प्रति महिना १७ हजार) यांची भरती करण्यात येणार आहे.
ज्यांना कोरोनाकाळात सेवा करण्याची इच्छा असेल, अशा पात्र व्यक्तींनी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.