जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित होणार - उदय सामंत
By मनोज मुळ्ये | Published: October 6, 2023 02:37 PM2023-10-06T14:37:48+5:302023-10-06T14:38:13+5:30
नांदेड जिल्हा रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य खात्याने गंभीर दखल घेतली आहे. मात्र रत्नागिरीमध्ये अनेक पदे रिक्त आहेत
रत्नागिरी - येथे नव्याने सुरू झालेल्या शासकीय महाविद्यालयाचा आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचा करार आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांची प्रॅक्टिकल्स जिल्हा रुग्णालयात होणार आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित होणार आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद हे त्याचे काम पाहतील आणि महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर्स जिल्हा रुग्णालयात सेवा देतील. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांची अडचण दूर होईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
नांदेड जिल्हा रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य खात्याने गंभीर दखल घेतली आहे. मात्र रत्नागिरीमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. त्यावर काय पर्याय काढणार, याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री सामंत यांनी ही माहिती दिली. रत्नागिरीतील महिला रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. तेथे शिकणाऱ्या मुलांना प्रॅक्टिकल्ससाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले जाणार आहे. तसा करार आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालय शासकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित होणार आहे. आधीचे तेथील वैद्यकीय अधिकारी आणि शासकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी मिळून अधिक दर्जेदार सेवा देतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
निधी आधीच मंजूर केला आहे
शासकीय रुग्णालयातील औषधांसाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र नांदेडमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झालेला नाही. आपण हा निधी १५ दिवसांपूर्वीच मंजूर केला आहे. मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांकडून प्रस्ताव वेळेत गेला नसल्याने त्यांना ते पैसे उशिरा मिळाले आहेत, असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.