शहरासह जिल्ह्यात मुसळधार

By admin | Published: June 13, 2016 10:47 PM2016-06-13T22:47:46+5:302016-06-14T00:04:39+5:30

मान्सूनपूर्व पाऊस : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वृष्टी; हवामान खात्याचा निर्वाळा

The district, including the city, | शहरासह जिल्ह्यात मुसळधार

शहरासह जिल्ह्यात मुसळधार

Next

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला असून, सोमवारी सकाळपासूनच सरीवर सरी कोसळू लागल्या आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १६६.५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात शनिवारपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. रविवारी काहीशी विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी पहाटेपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून रत्नागिरी शहरात संततधार सुरू असल्याने शहरातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. दिवसभर पाऊस सुरू होता. त्यामुळे हा मान्सूनचा पाऊस असल्याचा अंदाज नागरिकांकडून व्यक्त होत होता. मात्र, हवामान खात्याने हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे स्पष्ट केले आहे. समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मेघगर्जनेसह पाऊस पडत असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी बरसलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. जयस्तंभ, जेलरोड, लक्ष्मी चौक, जिल्हा परिषद रोड, आदी भागात अर्धा फूट पाणी साचले होते. रत्नागिरीतील मुख्य रस्त्यावर जिल्हा परिषदेनजीक मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने चढावातून वाहने नेताना तारेवरची कसरत करावी लागत होती. शहरातील फगरवठार येथील ओढ्याला पूर येऊन पूल पाण्याखाली गेला होता.
दरम्यान, हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र पडला आहे. चिपळूण, देवरुख आदी भागातही सोमवारी पाऊस झाला. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यांमध्ये किरकोळ सरी, तर गुहागर, लांजा आणि राजापूरमध्ये मध्यम प्रकारचा, रत्नागिरी शहरासह संपूर्ण तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झालेल्या दूरध्वनी संदेशानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यातील खोरनिनको येथे एका घराचे किरकोळ नुकसान झाले. तसेच सायंकाळच्या सुमारास रत्नागिरी शहरानजीकच्या निवखोल येथील एका चाळीवर बांध कोसळून मातीचा ढिगारा घरात कोसळला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The district, including the city,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.