जिल्ह्याचा अडीचशे कोटींचा आराखडा; शासनाकडून ७३ कोटी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:36 AM2021-08-25T04:36:49+5:302021-08-25T04:36:49+5:30
रत्नागिरी : जिल्हयाला २०२१-२२ साठी २५० कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यातील ४३ कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय ...
रत्नागिरी : जिल्हयाला २०२१-२२ साठी २५० कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यातील ४३ कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी ७२ कोटी ९९ लाख ५७ हजार इतका निधी जिल्ह्याला मिळाला आहे. यापैकी २८ कोटी २१ लाख ९१ हजार इतका निधी विविध यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे. जिल्हा नियोजनच्या निधीतून आतापर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत सभागृहात पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची २०२१-२२ या वर्षातील पहिली बैठक झाली. या बैठकीवेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार अनिकेत तटकरे, बाळाराम पाटील, भास्कर जाधव, शेखर निकम, योगेश कदम, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य उपस्थित होते. खासदार सुनील तटकरे दूरदृश्य प्रणालीने सहभागी झाले होते.
या बैठकीत पुढीलप्रमाणे कार्यवाही झाली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी २११ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. गतवर्षी संपूर्ण निधी जिल्ह्याला मिळाला. २१० कोटी ६० लाख ८१ हजारांचा निधी संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे. विशेष घटक योजनेचा २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी तरतूद असलेला १७ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मिळाला असून, त्यापैकी १७ कोटी ६८ लाख ६५ हजार खर्च झाले आहेत.
...............................
गतवर्षीचा कोविडअंतर्गत खर्च...
नियोजन विभागाच्या मंजूर निधीच्या १६.५ टक्के (३४.८१) कोटी इतका निधी राखून ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार १३ कोटी ९५ लाख ४७ हजार निधी वितरित करण्यात आला आहे.
.............................
कोरोनासाठी ३० टक्के निधी...
जिल्हयाचा मंजूर अर्थसंकल्पित नियतव्यय २५० कोटी रुपयांचा आहे. यात पूर्व दायित्व ५७ कोटी ८६ लाख ६२ हजार इतके आहे. गाभा व बिगर गाभा क्षेत्रासाठी २४१ कोटी तर ४.५ टक्के रक्कम नावीन्यपूर्ण योजनांसाठी आहे. तथापि नियोजन विभागाकडील ७ मे २०२० रोजीच्या सूचनेनुसार मंजूर निधींपैकी ७५ कोटी (३० टक्के) कोरोना उपाययोजनासाठी खर्च करण्याच्या सूचना आहेत. आतापर्यंत २८ कोटी १४ लाख ९४ हजार इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे.
...............
आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेसाठी गतवर्षी १ कोटी ८ लाख ९१ हजार रुपये निधी मिळाला. त्यापैकी १ कोटी ४ लाख ९६ हजार रुपये खर्च झाले. चालू आर्थिक वर्षाकरिताही १ कोटी ८ लाख ९१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
..........................
अतिवृष्टीसाठी तरतूद खर्च...
जिल्ह्यात २२ ते २५ जुलै या कालावधीत झालेल्या पूरपरिस्थिती - अतिवृष्टीअंतर्गत झालेल्या तात्काळ उपाययोजनेच्या अनुषंगाने आतापर्यंत ४ कोटी ५६ लाख ८१ हजार इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.