जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:34 AM2021-09-27T04:34:38+5:302021-09-27T04:34:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने दि. ४ ऑक्टोपासून शाळा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे पाचवी ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शासनाने दि. ४ ऑक्टोपासून शाळा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे पाचवी ते बारावीपर्यंतच्या जिल्हा परिषद व खासगी शाळा मिळून जिल्ह्यातील ३,१३१ शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील ७६.५८ टक्के विद्यार्थ्यांचे कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापन सुरू होते. मात्र, आता पहिली ते चौथीचे वर्ग वगळता पाचवीपासून बारावीपर्यंतचे सर्वच विद्यार्थ्यांचे ऑफलाइन अध्यापन सुरू होणार आहे.
कोरोनामुळे गतवर्षीही ऑनलाइन अध्यापन सुरू होते. दिवाळी सुट्टीनंतर सुरुवातीला नववी ते बारावी व जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र, वार्षिक परीक्षेपूर्वीच कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने परीक्षाच रद्द करण्यात आल्या व सरसकट मुलांना पास करण्यात आले. जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. परंतु, कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापनासाठी परवानगी देण्यात आली. कोरोनामुक्त असलेल्या गावातून शाळा सुरू करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील अवघ्या ६० शाळांचे अध्यापन सुरू झाले होते.
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली घट लक्षात घेऊन शासनाने शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग तर ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची सूचना केली आहे. प्रत्येक शाळेला आरोग्य केंद्राशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शाळांमध्ये खेळांना परवानगी नाकारण्यात आली आहे. शाळेत उपस्थितीची अट ठेवण्यात आलेली नाही, शिवाय वर्ग सुरू करताना पालकांची संमत्ती घेणे आवश्यक असल्याचे सूचित केले आहे. तसेच शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनांना अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ३,१५१ शाळांमधील पाचवी ते आठवीपर्यंतच्या एक लाख ६२ हजार ६१६ विद्यार्थ्यांचे ऑफलाइन अध्यापन सुरू होणार आहे.
—————————-
शासनाने दि. ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. त्याबाबतचे परिपत्रक लवकरच प्राप्त होईल. शासनाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार असून, याबाबतच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. नवीन परिपत्रक प्राप्त होताच शाळांना पाठविण्यात येणार असून, पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी
————————
एकूण शाळा ३१५१
पाचवी ते आठवीचे एकूण विद्यार्थी १,६२, ६१६
—————————
विद्यार्थी संख्या
इयत्ता मुलगे मुली एकूण विद्यार्थी
पाचवी १०२३३ ९५०३ १९७३६
सहावी १०५२७ ९८२२ २०३४९
सातवी १०३६७ ९८६३ २०२३०
आठवी १०८७७ ९८८४ २०७५४
नववी ११३८५ १०८१९ २२२०४
दहावी ११२३७ १०६९३ २१९३०
अकरावी ९७७४ ९६६८ १९४४२
बारावी ८९३२ ८८३९ १७७७१