जिल्हानिहाय आराखडा लवकरच तयार होणार
By Admin | Published: February 8, 2015 01:02 AM2015-02-08T01:02:25+5:302015-02-08T01:04:06+5:30
जलयुक्त शिवार अभियान : जिल्ह्यातील ४५ गावांची निवड
रत्नागिरी : ‘सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४५ गावांची निवड करण्यात आली आहे. हे अभियान राबवण्यासाठी जिल्हानिहाय आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे.
राज्यात सतत उद्भवणारी पाणीटंचाई विचारात घेऊन हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्हानिहाय आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात शासनाच्या विविध योजनांतर्गत उपलब्ध होणारा निधी, मनरेगा निधीचाही विनियोग करण्यात येणार आहे. तसेच स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, खासगी उद्योगांचे सीएसआरअंतर्गत सहकार्य, सहकारी संस्था आणि लोकसहभाग याचा विचार करण्यात येणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून गावातील पाणीटंचाई समस्या सोडविणारी कामे हाती घेण्यावर भर देण्यात आला आहे. याअंतर्गत पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारातच अडविणे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे. राज्याच्या सिंंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे. सर्वांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती, ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू करणे. भूजल अधिनियमाची अंमलबजावणी करणे. विकेंद्रीत पाणीसाठे कमी करणे. पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे. अस्तित्त्वात असलेले व निकामी झालेल्या विविध स्रोतांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, अस्तित्त्वातील जलस्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून जलस्रोतांचा पाणीसाठा वाढविणे. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणे, पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जाणीवजागृती निर्माण करणे. शेतीच्या पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पाणी अडविणे, जिरविणेबाबत लोकांना प्रोत्साहित करणे तसेच लोकसहभाग वाढविणे, अशा शाश्वत जलसंचयाला चालना देणाऱ्या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
सर्वांसाठी पाणी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जलयुक्त शिवार अभियानातंर्गत पाणलोट विकासाची कामे, साखळी सिमेंटकाँक्रिट नाला बंधाऱ्याची कामे, नाला खोलीकरण, रुंदीकरणासह करणे, जुन्या जलसंरचना कार्यान्वित करणे, अस्तित्त्वातील लघु पाटबंधारे संरचनांची दुरुस्ती करणे. पाझर तलाव, लघुसिंंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)