दिवा-रत्नागिरी पॅसेंजरला लवकरच चढणार नवा साज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 12:40 PM2023-12-04T12:40:25+5:302023-12-04T12:40:43+5:30

रत्नागिरी : काेकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दिवा- रत्नागिरी पॅसेंजरचे रूपडे पालटणार आहे. देखभाल दुरुस्तीसह वेगवर्धन, सेक्शनमध्ये लवकर क्लिअरन्स मिळणे, ...

Diva-Ratnagiri passenger will soon board a new train | दिवा-रत्नागिरी पॅसेंजरला लवकरच चढणार नवा साज

दिवा-रत्नागिरी पॅसेंजरला लवकरच चढणार नवा साज

रत्नागिरी : काेकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दिवा-रत्नागिरी पॅसेंजरचे रूपडे पालटणार आहे. देखभाल दुरुस्तीसह वेगवर्धन, सेक्शनमध्ये लवकर क्लिअरन्स मिळणे, अशा सुविधांबराेबरच मेमू प्रकारातील ही गाडी असेल. त्यामुळे या गाडीला नवा साज चढणार आहे. मात्र, गाडीचे रूपडे बदलताना प्रवाशांच्या आसन क्षमतेत घट केली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर दादर-रत्नागिरी पॅसेंजर (५०१०३/५०१०४) ही गाडी धावत आहे. कोरोना काळापासून ही गाडी दिवा-रत्नागिरी पॅसेंजर करण्यात आली. दोन वर्षांपूर्वीच पूर्वीच्या निळ्या पांढऱ्या रंगसंगतीमधील जुन्या गाडी ऐवजी लाल रंगातील एलएचबी श्रेणीमधील दीनदयाळ प्रकारच्या कोचसह धावत आहे. मात्र, आता ही गाडी आणखी नव्या रंगरूपात धावणार आहे.

दिवा-रत्नागिरी ही गाडी लाल-करड्या रंगसंगतीमधील एलएचबी रेकऐवजी मेमू प्रकारात धावणार आहे. यासाठी आयसीएफ कपूरथळा येथील कारखान्यात ‘रेक’ तयार करण्याची ऑर्डर देण्यात आली होती. दिवा ते रत्नागिरी मार्गावर सध्या धावत असलेल्या गाडीला रिप्लेस करण्यासाठी मेमू गाडी मध्य रेल्वेच्या हद्दीत दाखल झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या मेमू गाडीसाठी आवश्यक असलेले सर्व डबे दाखल झाल्यानंतर ही गाडी सध्याच्या गाडी ऐवजी चालवली जाणार आहे.

वेळ वाचणार

दिवा ते रत्नागिरी गाडी ती धावणार असलेल्या दिशेला विद्युत इंजिन जोडून चालवली जात आहे. मात्र, मेमू गाडीला दोन्ही बाजूला इंजिन असल्यामुळे सध्या ‘लोको रिव्हर्सल’साठी लागणारा वेळ वाचणार आहे. तसेच या प्रकारातील रेक पंधरा दिवसांतून एकदा तांत्रिक देखभालीसाठी पाठवला तरी चालतो. सध्याच्या गाडीची आठवड्यातून एकदा देखभाल करावी लागत आहे.

आसन क्षमता घटणार

दिवा-रत्नागिरी गाडीतील आसन रचना गर्दीच्या हंगामात प्रवाशांसाठी लाभदायक ठरत होती. सीटच्या वरही बसण्याची व्यवस्था असल्याने गर्दीच्या वेळी खाली जागा नाही मिळाली तर प्रवासीवर जाऊन बसू शकत होते. मात्र, नव्याने येणाऱ्या मेमूमध्ये अशी व्यवस्था ठेवण्यात येणार नाही. त्यामुळे आसन क्षमता कमी हाेणार आहे.

Web Title: Diva-Ratnagiri passenger will soon board a new train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.