Divyang - दिव्यांग दिनी दोघांना मिळाले स्वप्नातील घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 06:28 PM2020-12-04T18:28:41+5:302020-12-04T18:30:21+5:30
Chiplun Nagar Parishad, Ratnagiri, Home, Diyang जन्मतःच अपंगत्व आल्यानंतर आयुष्यात स्वप्नातले घर होईल की नाही, अशी रुखरुख कायम मनात असायची. परंतु, चिपळूण नगर परिषदने आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात दिल्याने शहरातील मुरादपूर येथील दोघांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्याहस्ते गुरुवारी या दोन्ही वास्तूंचे उद्घाटन करत दिव्यांग कुटुंबियांना दिव्यांग दिनी अनोखी भेट देण्यात आली.
चिपळूण : जन्मतःच अपंगत्व आल्यानंतर आयुष्यात स्वप्नातले घर होईल की नाही, अशी रुखरुख कायम मनात असायची. परंतु, चिपळूण नगर परिषदने आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात दिल्याने शहरातील मुरादपूर येथील दोघांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्याहस्ते गुरुवारी या दोन्ही वास्तूंचे उद्घाटन करत दिव्यांग कुटुंबियांना दिव्यांग दिनी अनोखी भेट देण्यात आली.
दरवर्षी चिपळूण नगर परिषदेकडून अर्थसंकल्पाच्या ५ टक्के राखीव निधीतून दिव्यांगांना आर्थिक सहाय्य केले जाते. त्यासाठी संबंधितांकडून प्रस्ताव मागविण्यात येतात. यावर्षीही प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार शहरातील मरादपूर येथील प्रशांत घाडगे, अरविंद गोरिवले यांनी घरकुलसाठी प्रस्ताव सादर केला होता.
त्यांना २.५० ते ३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून दोघांनीही घरकुलाचे काम पूर्ण केले आहे. हे काम आधीच पूर्ण झाले होते. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे मुहूर्त लांबला. अखेर गुरुवारी या घरकुलांचे उद्घाटन करण्यात आले.
त्याचबरोबर ९३ हजार रुपये किमतीची मोटारसायकल सुगंधा कांबळी, विजया कुलकर्णी, मीनाक्षी वटकर, प्रशांत घाडगे, रेखा राजेशिर्के, अरविंद गोरिवले या दिव्यांगांना देण्यात आली. त्यांना मोटारसायकलच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यासमवेत मुख्याधिकारी वैभव विधाते, नगरसेविका वर्षा जागुष्टे, रसिका देवळेकर, शिवानी पवार, संजीवनी शिगवण, नगरसेवक आशिष खातू, परिमल भोसले, रश्मी गोखले उपस्थित होते.