Divyang - दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी आस्थाचा अविरत लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 05:55 PM2020-12-03T17:55:27+5:302020-12-03T17:56:44+5:30
Divyang, ratnagirinews आपल्या स्वमग्न मुलाचे पालनपोषण आयुष्यभर करावयाचे आहे, त्यादृष्ष्टीने प्रयत्न करतानाच इतर अशा मुलांसाठी प्रयत्न करायला हवेत, या उद्देशाने सुरेखा पाथरे यांनी २०१३ साली आस्था सोशल फाऊंडेशनची निर्मिती केली. ही संस्था अशा मुलांना स्वावलंबी बनवतानाच दिव्यांगांच्या सन्मान आणि स्वावलंबनासाठी अव्याहत कणखरपणे लढा देत आहे.
शोभना कांबळे
रत्नागिरी : आपल्या स्वमग्न मुलाचे पालनपोषण आयुष्यभर करावयाचे आहे, त्यादृष्ष्टीने प्रयत्न करतानाच इतर अशा मुलांसाठी प्रयत्न करायला हवेत, या उद्देशाने सुरेखा पाथरे यांनी २०१३ साली आस्था सोशल फाऊंडेशनची निर्मिती केली. ही संस्था अशा मुलांना स्वावलंबी बनवतानाच दिव्यांगांच्या सन्मान आणि स्वावलंबनासाठी अव्याहत कणखरपणे लढा देत आहे.
आपल्या स्वमग्न मुलाच्या, आल्हादच्या पालनपोषणासाठी सुरेखा पाथरे यांनी जिल्हा परिषदेतील अधिकारीपदाच्या नोकरीचाही त्याग केला. पण त्या स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी इतर मुलांसाठीही काम सुरू केले. २०१३ साली त्यांनी रत्नागिरीतच शिवाजी स्टेडिअम येथील गाळ्यात ६ वर्षाखालील मुलांसाठी अपंगत्वाचे शीघ्र निदान व उपचार केंद्र सुरू केले. त्यानंतर ६ वर्षावरील मुलांसाठीही थेरपी सेंटर सुरू केले. या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, समावेशक शिक्षणावर भर देत स्वत: ग्रुप थेरपी सेंटरबरोबरच विशेष शिक्षण केंद्र सुरू केले. आज या केंद्रात जिल्हाभरातील ३२ मुले आहेत.
हे करतानाच या मुलांचे पालक आणि इतर दिव्यांग यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आस्था दिव्यांग हेल्पलाईन सुरू केली. त्याद्वारे बस, रेल्वे पास आदी समस्या सुटल्या. आस्था दिव्यांग वकालत केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांच्या ५ टक्के निधीचा प्रश्न मार्गी लावला. दिव्यांगांना वाहन परवानासाठी रत्नागिरीतच फिटनेस सर्टिफिकेट मिळू लागले आहे. कर्णबधिरांनाही श्रवण चाचणीवर फिटनेस सर्टिफिकेट मिळू लागले आहे. आस्थामुळे ३,७७० कुटुंबांना धान्याचा अधिकार मिळाला आहे.
यात महत्त्वाचे म्हणजे पाच टक्के राखीव निधी नियंत्रण समितीवर आस्थाची निवड झाली आहे. त्यामुळे या निधीचे योग्यप्रकारे नियोजन होण्यासाठी संस्था आग्रही असते. अथक प्रयत्नाने रत्नागिरीत तीन वर्षांपासून दिव्यांगांच्या जिल्हा क्रीडा स्पर्धा होत आहेत. विशेष म्हणजे या संस्थेचे ९० टक्के कर्मचारी दिव्यांग आहेत.