दबावाला भीक घालणार नाही : गावडे
By admin | Published: February 25, 2015 09:51 PM2015-02-25T21:51:22+5:302015-02-26T00:15:32+5:30
त्यावेळी पोलिसांनी तेथील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तेथील काही दस्तऐवज राजापूर तहसीलदारांच्या परवानगीशिवाय ताब्यात घेतला होता.
राजापूर : बनावट दाखले प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे पुढील काही दिवसातच या प्रकरणाचा छडा लागेल, असा विश्वास पोलीस निरीक्षक विकास गावडे त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. या बोगस दाखले प्रकरणामध्ये अजून काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे. कोणताही दबाव न जुमानता दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.प्रांतांच्या खोट्या सह्या करून बोगस दाखले दिल्याचे प्रकरण गेल्या दोन आठवड्यांपासून चांगलेच गाजत आहे. या प्रकरणाच्या राजापूर पोलिसांच्या तपासाबाबत समाजाच्या सर्वच स्तरातून शंका व्यक्त केली जात होती. राजापूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना पहिल्यापासूनच मुख्य सूत्रधाराला मोकळे सोडून या प्रकरणातील सत्य पोलिसांना उजेडातच आणावयाचे नाही, असा आरोप सर्वसामान्य जनतेतून करण्यात येत होता. दुसरीकडे या प्रकरणाचे धागेदोरे शोधताना या बोगस दाखल्यांची कनेक्टिव्हीटी प्रथम पाचल व नंतर नाटे महा-ई-सेवा केंद्र्रापर्यंत असल्याचे उघड झाले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण तिघांना अटक झालेली असून त्यांची पोलीस कोठडी संपलेली आहे, तर महा-ई-सेवा केंद्र्राच्या संचालिका झोया खलिफे यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणामध्ये अजून काही संशयित आरोपी आहेत. राजापूर पोलीस त्यांच्यापर्यंत लवकरच पोहोचतील व त्यांना कायदेशीररित्या अटक केली जाईल, असा विश्वास गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.या बोगस दाखले प्रकरणाचा तपास करताना राजापूर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी राजापूर सेतू कार्यालयाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला होता. त्यावेळी पोलिसांनी तेथील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तेथील काही दस्तऐवज राजापूर तहसीलदारांच्या परवानगीशिवाय ताब्यात घेतला होता. तो दस्तऐवज पुन्हा तहसीलदारांकडे परत केला जाईल व त्यानंतर रितसर लेखी पत्र देऊन संबंधित तपासाकामी हवा असलेला दस्तऐवज पंचासमक्ष ताब्यात घेतला जाईल, असेही यावेळी गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. (प्रतिनिधी)
1राजापूर पोलिसांनी आपल्या कार्यालयातील सेतूमध्ये घुसून तेथील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत काही दस्तऐवज आपल्या परवानगीशिवाय नेला असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार गुरूनाथ हुन्नरे यांनी दिली.
2नाटे येथील महा-ई सेवा केंद्राचे संचालक विलास नारकर यानी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याबाबतचे म्हणणे मांडण्यासाठी पोलिसांना ३ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली.
3बोगस दाखलेप्रकरणी पाचल येथील सिध्देश नथुराम नारकर यांनीही जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, त्यावर निर्णय देताना न्यायालयाने नारकर यांना अटक करताना ७२ तासांची नोटीस देऊन मगच अटक करावी, असे आदेश पोलिसांना दिले आहेत.