कर्मचारी नको, कलाकार बना

By admin | Published: February 26, 2017 12:25 AM2017-02-26T00:25:33+5:302017-02-26T00:25:33+5:30

संदीप खरे : युवा नाट्य व साहित्य संमेलनाचे रत्नागिरीत उद्घाटन

Do not be an employee, make an artist | कर्मचारी नको, कलाकार बना

कर्मचारी नको, कलाकार बना

Next

रत्नागिरी : एखाद्या कलेचं थोडंफार लेणं ज्यांच्या हाती पडलं आहे, त्यांनी हे निसर्गाचं देणं नीट जपून ठेवावे, त्याची जमेल तशी जोपासना करा. पैसा व यशापाठी वेड्यासारखं धावत सुटण्याच्या युगात या कला तुम्हाला माणूस म्हणून राहण्यासाठी मदत करतील. अक्षरलेखनापासून विज्ञानाची रहस्य शोधण्यापर्यंत सर्वत्र काही न काही प्रतिभेची गरज आहे. जे काम करू ते रसपूर्ण करणं यापेक्षा कलाकार अजून वेगळं काय करीत असतो ? त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात काम केलं तरी कर्मचारी बनू नका, कलाकार बना, असे प्रतिपादन प्रख्यात कवी संदीप खरे यांनी युवा नाट्य व साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा रत्नागिरी व अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य व नाट्य संमेलनास शनिवारी जयेश मंगल कार्यालय येथे प्रारंभ झाला. त्यावेळी संदीप खरे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रवींद्र वायकर, अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे नूतन अध्यक्ष जयंत सावरकर, मावळते अध्यक्ष गंगाराम गवाणकर, आमदार उदय सामंत, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीता राजे, पवार, विभागीय संमेलनाचे निमंत्रक पद्माकर कुलकर्णी, सहनिमंत्रक राजन लाखे, विभागीय कार्यवाह प्राचार्य तानसेन जगताप, विनोद कुलकणी उपस्थित होते.
प्रास्ताविकात मसापचे रत्नागिरी कार्याध्यक्ष अनिल दांडेकर यांनी रत्नागिरी शाखेचा आढावा घेतला. पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या सूचनेनुसार गंगाराम गवाणकर यांनी ‘वस्त्रहरण’ नाटकांतील चुटकुले सादर करून प्रेक्षकांना हसविले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी मार्गदर्शन करताना तंत्रज्ञानाचे महत्त्व न नाकारता संवेदनशीलतेचा जागर होण्यासाठी युवकांसाठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून साहित्य व नाट्याची युती झाल्याचे स्पष्ट केले. मसापतर्फे संमेलनासाठी ५० हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
आमदार उदय सामंत यांनी मार्गदर्शन करताना संमेलनास गर्दीपेक्षा दर्दी असल्याचे सांगितले. काही ज्येष्ठ रंगकर्मींची हलाखीची स्थिती आहे. पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी आपल्या भाषणातून केली. सांगलीपाठोपाठ रत्नागिरी ‘सांस्कृतिक पंढरी’ असल्याचे सांगितले.
पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मार्गदर्शन करताना अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी संमेलनासाठी वैयक्तिक ५० हजार रुपयांची देणगी जाहीर केली. नावीन्यपूर्ण योजनेतून सभागृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देतो, मात्र जागा द्या, अशी सूचना केली. साहित्यिक, पत्रकार, पोलिसांसाठी राखीव कोटा आहे. जिल्हा प्रशासनाकडे राखीव भूखंडाबाबत चर्चा करून संबंधितांना घरे मिळवून देण्याचा प्रयत्न राहील, असेही आश्वासन दिले.
नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी रंगमंच कलाकार, कामगार यांची घरांसाठी एकरकमी पैसे भरण्याची ताकद नाही, त्याबाबत साहाय्य करण्याची सूचना करताच पालकमंत्र्यांनी त्याबाबतचे प्रयोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
वाचनासह भाषेवर प्रेम करा
पुस्तकांवर प्रेम करा, भाषेवर प्रेम करा, भाषेच्या चलनाकडे, जडणघडणीकडे जाणीवपूर्वक पाहा. भाषा कशी होती, कशी आहे, कशी बदलते, हे रस घेऊन निरखा. आपल्या भाग्याने मराठीसारख्या समृद्ध भाषेत जन्माला आलो आहे. नवे संदर्भ आत्मसात करीत असताना जुने शब्दही जतन करायला हवेत. जुन्या साहित्यिकांपासून नवीन लेखक, कवी मुद्दाम वाचा, असे आवाहन संदीप खरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.

Web Title: Do not be an employee, make an artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.