पूरग्रस्तांचे वीज कनेक्शन थेट खंंडित करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:33 AM2021-09-19T04:33:21+5:302021-09-19T04:33:21+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क अडरे : वीज बिल थकीतचे कारण देऊन महावितरणने सुरू केलेली सक्त वसुली आणि वीजजोडणी खंडितच्या माेहिमेला ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
अडरे : वीज बिल थकीतचे कारण देऊन महावितरणने सुरू केलेली सक्त वसुली आणि वीजजोडणी खंडितच्या माेहिमेला चिपळूण व्यापारी महासंघटनेने थेट आक्षेप घेतला आहे. याबाबत महावितरण कार्यालयात धाव घेत पूरग्रस्त व्यापारी व नागरिकांचा वीजपुरवठा थेट खंडित न करता त्यांना मुदत व सवलत द्यावी. २ ते ३ टप्प्यात रक्कम भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे. जर पूरग्रस्तांवर वसुलीसाठी सक्ती झाल्यास किंवा वीज जोडणी थेट खंडित केल्यास जनप्रक्षोभ उसळेल, असा इशाराही दिला आहे.
महावितरणची थकबाकी वाढल्याने ग्राहकांकडून सक्त वसुली करण्याची मोहीम सुरू केली आहे. चिपळूणमध्येही मोहीम सुरू करण्यात आली असून, काहींचे वीज कनेक्शनही ताेडले आहे. महापुराचा तडाखा सहन करून सावरत असलेल्या चिपळूणमधील पूरग्रस्तांना व्यापाऱ्यांना महावितरणने आणखी एक दणका देण्यास सुरुवात केल्याने येथील चिपळूण व्यापारी महासंघटना आक्रमक झाली आहे. येथील व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष किशोर रेडीज, सचिव उदय ओतरी, ज्येष्ठ व्यापारी अरुण भोजने यांनी थेट चिपळूण महावितरण कार्यालयात जाऊन येथील कार्यकारी अभियंत्याची भेट घेतली.
चिपळूणमध्ये आलेला महापूर यामुळे वीजबिले थकीत झाली आहेत. चिपळूणचे नागरिक, व्यापारी हे स्वाभिमानी आहेत. ते उपाशी राहतील परंतु कोणाचा एक रुपया बुडवणार नाहीत. येथील नागरिक वीजचोरी अजिबात करत नाहीत. तो करणार देखील नाही. परंतु, कोरोना महामारी आणि महापूर यामध्ये येथील व्यापारी आणि प्रत्येक नागरिक कोलमडून पडला आहे, असे स्पष्टपणे व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.