पाणी पिताय ना; मग काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:38 AM2021-09-09T04:38:22+5:302021-09-09T04:38:22+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पावसामुळे नदी, ओढ्यांना पूर येत असल्याने मुख्यस्रोतात पुराचे पाणी मिसळून पाणी गढूळ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पावसामुळे नदी, ओढ्यांना पूर येत असल्याने मुख्यस्रोतात पुराचे पाणी मिसळून पाणी गढूळ होते. दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याचे शुद्धीकरण केले जात असले तरी शहरातील अंतर्गत वाहिन्यांना गळती असल्यामुळे गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून गाळून पिणे गरजेचे आहे.
दूषित पाणी व हवामानातील बदलामुळे साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिक कोरोनाच्या भीतीमुळे डाॅक्टरांकडे जाण्याऐवजी घरातच उपचार घेतात. पाण्याच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे.
दूषित पाण्यामुळे
होणारे आजार
उलटी, जुलाब किंवा अतिसाराचा धोका
कावीळ होण्याची असते शक्यता
गॅस्ट्रोमुळे शरीर कोरडे पडण्याचा धोका
विषमज्वरासारख्या तापाची असते शक्यता. तापामुळे शरीरातील पेशींची होते घट.
आजाराची लक्षणे
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पाण्यासारखे शाैचास होणे.
उलटी, ताप येणे, लघवी पिवळी होणे, भूक मंदावणे,
जुलाब होऊन शरीरातील पाणी कमी होते.
सलग चार ते पाच दिवस सतत ताप येतो. पोटात दुखते, वेळीच उपचाराची आवश्यकता असते.
रत्नागिरीकर पितात दररोज एक कोटी ८० लिटर पाणी
शहराची लोकसंख्या ७६ हजार २२९ आहे. नगर परिषद हद्दीत अकरा हजार नळपाणी जोडण्या असून, शहराला दररोज एक कोटी २० लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. साळवी स्टाॅप जलशुद्धीकरण केंद्रात गॅस क्लोरिनचा वापर करून पाणी शुद्ध केले जाते. गढुळता कमी करण्यासाठी पाॅलिॲल्युमिनियम क्लोराइडचा वापर करण्यात येतो.
पाणी उकळून प्यायलेले बरे
पावसाळ्यात नदी, ओढ्यांना पूर येतो. पुराचे पाणी मुख्य प्राण्याच्या स्रोतात मिसळल्याने पाणी गढूळ होते. त्यामुळे पाणी उकळून, गाळून पिणे नक्कीच फायदेशीर आहे.