अंगणवाड्यांना धान्यच नाही!
By admin | Published: August 5, 2016 12:50 AM2016-08-05T00:50:57+5:302016-08-05T02:04:03+5:30
संगमेश्वर तालुका : जास्त दराने धान्य घेण्याची वेळ
देवरूख : रास्तदर धान्य दुकानांच्या मागणीप्रमाणे पुरवठा विभागाकडून धान्याचा पुरवठा न झाल्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील बहुतांश अंगणवाड्यांना धान्याची उपलब्धता झालेली नाही. यामुळे बालकांना पोषण आहार देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना बाजारातून जास्त दराने धान्य विकत घेऊन आहार द्यावा लागत आहे. प्रशासनाच्या चुकीचा फटका अंगणवाडी सेविका आणि बचत गटांना सहन करावा लागत
आहे.
जानेवारी ते जून या महिन्याचे धान्य अंगणवाडी सेविका वा बचत गटांना मिळालेले नाही. यामुळे अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. रास्तदर धान्य दुकानदारांशी वारंवार संपर्क साधला असता, काही अंगणवाड्यांचे धान्य प्राप्त न झाल्याचे सांगण्यात येते. यामध्ये देवरूख परिसरातील अंगणवाड्यांचा समावेश आहे. त्यांना धान्य मिळतच नाही.
याबाबत पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता जिल्हा पुरवठा विभागाकडून मागणीप्रमाणे धान्य उपलब्ध न झाल्याने हा गोंधळ झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये तालुक्याची ७८ क्विंटल तांदळाची मागणी असताना केवळ ६० क्विंटल तांदूळ प्राप्त झाला आहे. यामुळे आलेल्या तांदळाप्रमाणे वाटप करताना अंगणवाड्यांचे धान्य रखडून राहिले आहे.
फरकाच्या तांदळाची मागणी नवीन महिन्याच्या मागणी प्रमाणे केली आहे. यानुसार धान्य आल्यास दोन दिवसातच अंगणवाड्यांना धान्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार शिजवून देताना अंगणवाडी सेविका तसेच बचत गटांच्या महिलांना खुल्या बाजारातून धान्य खरेदी करावे लागत आहे. यात जादा रक्कम खर्च होत आहे. बालकांना उपाशी राहावे लागू नये, यासाठी हा आहार शिजवण्यासाठी पदरमोड करावी लागत आहे. लवकरात लवकर धान्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी देखील देवरुख परिसरातील अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
शिक्षण क्षेत्रातून नाराजी : पदरमोड करून पोषण आहाराची सोय
संगमेश्वर तालुक्यात गेल्या महिन्यापासून पोषण आहाराची सेवा विस्कळीत झाली आहे. धान्य वेळेवर मिळत नसल्याने जादा दराने धान्य घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.